जिल्ह्यातील १४३ गावांवर पाणी टंचाईचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 12:43 AM2019-02-06T00:43:37+5:302019-02-06T00:44:14+5:30
जिल्ह्यात यंदा परतीचा पाऊस न बसल्याने सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ २५ ते ३० टक्के पाणीसाठा आहे. याचा परिणाम भूजल पातळीवर झाला असून १४३ गावातील गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार असल्याची बाब भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालावरुन पुढे आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात यंदा परतीचा पाऊस न बसल्याने सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ २५ ते ३० टक्के पाणीसाठा आहे. याचा परिणाम भूजल पातळीवर झाला असून १४३ गावातील गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार असल्याची बाब भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालावरुन पुढे आली आहे.
गोंदिया जिल्ह्यात सरासरी १३४९ मि.मी.पाऊस पडतो. मात्र यंदा केवळ सरासरीच्या तुलनेत ११४५ मि.मी.पाऊस झाला. तर परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे. सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यावर भूजल पातळी अवंलबून असते. मात्र यंदा फेब्रुवारी महिन्यात केवळ २५ ते ३० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार अशी शक्यता वर्तविली जात होती. काही प्रमाणात पाणी पुरवठा विभागाच्या अहवालावरुन खरी झाली आहे. जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे उन्हाळ्यात निर्माण होणाºया पाणी टंचाईच्या पार्श्वभुमीवर चार टप्प्यात पाणी टंचाईचा आराखडा तयार केला जातो. जानेवारी ते मार्च महिन्याच्या तयार करण्यात आलेल्या आराखड्यात जिल्ह्यातील एकूण १४३ गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
यात १२३ गावे आणि २० वाड्यांचा समावेश आहे. पाणी टंचाईची सर्वाधिक झळ अर्जुनी मोरगाव, सालेकसा, देवरी या तालुक्यांना बसण्याची शक्यता आहे. कारण या भागात पावसाची सरासरी देखील कमी असून त्याचाच परिणाम सिंचन प्रकल्पांवर झाला आहे. जिल्ह्यात १४३ गावांमध्ये निर्माण होणारी संभाव्य पाणी टंचाईची शक्यता लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने २७२ उपाय योजना करण्यासाठी ७१ कोटी १६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याअंतर्गत पाणी टंचाईची सर्वाधिक समस्या असणाºया ४३ गावांमध्ये ४३ बोअरवेल तयार करण्यात येणार आहे. तसेच पाच गावातील नळ योजनांची व २२० बोअरवेल दुरूस्तीची कामे करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक निधीला जिल्हाधिकाºयांनी मंजुरी दिली आहे.