सोनपुरी परिसरासह तालुक्यात पाणी टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 11:55 PM2019-05-02T23:55:48+5:302019-05-02T23:56:28+5:30
सालेकसा तालुक्यातील सोनपुरी परिसरासह तालुक्यातील इतरही भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने उन्हाळ्यापूर्वी पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना केल्या नाही. परिणामी तालुक्यातील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपुरी : सालेकसा तालुक्यातील सोनपुरी परिसरासह तालुक्यातील इतरही भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने उन्हाळ्यापूर्वी पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना केल्या नाही. परिणामी तालुक्यातील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
तालुक्यातील विहिरी पूर्णपणे कोरड्या पडल्या आहे. बोअवरेलच्या पाण्याची पातळी खोलवर गेल्याने पुरेसे पाणी येत नाही. परिणामी नागरिकांना पाणी मिळत नसल्याने दूरवर भटकंती करावी लागत आहे. जिल्ह्यात मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने तलाव आणि सिंचन प्रकल्प सुध्दा कोरडे पडले आहे. केवळ एक दोन मोजक्याच तलावात पाणी शिल्लक आहे.
यावर्षी सोनपुरी परिसरासह सर्व मामा तलाव कोरडे पडले आहे. परिणामी भूजल पातळीत घट झाली असल्याने तलाव आणि विहिरींनी तळ गाठला आहे. परिसरातील अनेक बोअरवेल नादुरूस्त असून त्यांची अद्यापही दुरूस्ती करण्यात आली नाही.उन्हाळ्यापूर्वी तलावातील गाळाचा उपसा न केल्याने विहिरींनी सुध्दा तळ गाठला आहे. गावातील एक-दोन बोअरवेलला पाणी येत असल्याने त्यावर महिलांची पहाटेपासून गर्दी दिसून येत आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीमार्फत पाणी पुरवठा योजना राबविली जाते. परंतु ग्रामपंचायतवर वीज बिल थकीत असल्याने विद्युत विभागाने पाणी पुरवठा योजनांचा विद्युत पुरवठा खंडीत केला आहे. तर दुसरीकडे ग्रामपंचायत नागरिकांकडून नियमित कर वसुली करतात. मात्र नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे.
जनावरांच्या पाण्याचा प्रश्न
सालेकसा तालुक्यात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ९० ते ९५ टक्के आहे. शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करतात. त्यामुळे शेतकऱ्यांकडे जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणत आहे. मात्र यंदा वाढत्या तापमानामुळे नदी नाले कोरडे पडले असल्याने जनावरांच्या पिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पशुपालक सुध्दा अडचणीत आले आहे. या भागातील नागरिकांना नळ योजनेद्वारे सुद्धा पाणीपुरवठा करण्याच्या हेतूने १५-२० वर्षापूर्वी तालुक्यात प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे काम हाती घेण्यात आले होते. योजनेचे काम पाच वर्षापूर्वी पूर्ण झाले. पण अद्यापही ही योजना कार्यान्वीत झाली नाही.
पाणी पुरवठा योजना बंद
लटोरी आणि परिसरातील ३० गावांना पाणी पुरवठा करणारी योजना पूर्णत: बंद पडलेली आहे. ही योजना कार्यान्वीत झाली असती तरी नागरिकांची पाणी टंचाईची समस्या दूर झाली असती. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. तर पाणी टंचाई निवारणार्थ नवीन बोअरवेल खोदण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांनी जि.प.पाणी पुरवठा विभागाकडे केली. मात्र या विभागाने निवडणूक आचारसंहितेचे कारण देत याकडे दुर्लक्ष केले.
उन्हाळ्यापूर्वी उपाययोजना राबविण्यात प्रशासन नापास
जिल्हा नियोजन समितीने यंदा जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणार्थ कामे करण्यासाठी ४ कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करुन दिला. मात्र जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे पाणी टंचाई निवारणार्थ कामे वेळेत सुरू झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना भर उन्हाळ्यात पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत आहे. एकंदरीत उन्हाळ्यापूर्वी पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना राबविण्यात प्रशासन पूर्णपणे फेल झाले आहे.