जिल्ह्यातील १०३ गावांना बसणार पाणीटंचाईच्या झळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:29 AM2021-05-21T04:29:52+5:302021-05-21T04:29:52+5:30
गोंदिया : जिल्ह्यातील मागील दोन- तीन वर्षांपासून पाणीटंचाईची समस्या तीव्र स्वरूपात जाणवत आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तयार केलेल्या आराखडा ...
गोंदिया : जिल्ह्यातील मागील दोन- तीन वर्षांपासून पाणीटंचाईची समस्या तीव्र स्वरूपात जाणवत आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तयार केलेल्या आराखडा यंदा मे ते जून या कालावधीत ५८३ गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण होणार आहे. १०३ गाव आणि ७० वाड्यांमध्ये पाणीटंचाईची तीव्र समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल असून बाघ इटियाडोह विभागांतर्गत मोठ्या प्रकल्पांसह ९ मध्यम, लघु व मोठे तलाव आहेत. यासोबतच जिल्हा परिषदेचे दीड हजार तलाव आहेत. त्यामुळे पाणी सिंचनाची क्षमता जिल्ह्यातील जलस्रोतांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, मागील काही वर्षांत सरासरीपेक्षा कमी पाऊस होत असल्याने, तसेच पाणी साठवणुकीसाठी विशेष प्रयत्न झालेले नाहीत. परिणामी जिल्हावासीयांना उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. जिल्हा प्रशासनाद्वारे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मोठा निधी खर्च केला जात असला तरी अनेक गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन-दोन किलोमीटर पायपीट करावी लागते. यंदाही जिल्ह्यातील ५८३ गावांवर जलसंकट आले आहे.
....
या तालुक्यांमध्ये निर्माण होणार समस्या
गोंदिया तालुक्यातील १०३ गावे व ७० वाड्यांवर पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. तर गोरेगाव तालुक्यातील ४२ गावे व ३० वाड्या, सडक अर्जुनी ६३ गावे, अर्जुनी मोरगाव ८० गावे व १४ वाड्या, तिरोडा ६२ गावे, सालेकसा ४१ गावे, देवरी २४ गावे व ८ वाड्या व आमगाव तालुक्यातील ३७ गावे व ९ वाड्यातील नागरिकांवर जलसंकट ओढावले आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ५ कोटी ८९ लाख रुपयांच्या पाणीटंचाई आराखड्याला मंजुरी दिली आहे.
....
कोरोना संकटामध्ये पाणीटंचाई
कोरोना संसर्ग जिल्ह्यातही सातत्याने वाढत चालला आहे. त्यातच अवकाळी पावसामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक त्रासला आहे. त्यात आता पाणीटंचाईची भर पडल्याने आगामी दोन महिने कसे काढावे, असा प्रश्न नागरिकांसमोर आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून पाणीटंचाई दूर करावी, अशी मागणी होत आहे.