दुसऱ्यांदा सोडणार पुजारीटोलाचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 09:57 PM2018-05-10T21:57:38+5:302018-05-10T21:57:38+5:30
डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेत शहराला चार-पाच दिवस पाणी पुरवठा करता येणार एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी दुसऱ्यांदा पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेत शहराला चार-पाच दिवस पाणी पुरवठा करता येणार एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी दुसऱ्यांदा पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडण्यात येणार आहे. यासाठी शुक्रवारी (दि.११) पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडले जाणार असल्याचे सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पांमध्ये मोजकाच पाणीसाठा आहे.त्यामुळे यंदा जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. शहराला पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या डांगोली येथील वैनगंगा नदीचे पात्र देखील यंदा एप्रिल महिन्यातच कोरडे पडले. त्याचा परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर झाला आहे. शहरातील पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी डांर्गोलीपासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणातून पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे पाणी टंचाईवर मात करण्यास मोठी मदत झाली. मात्र आता नदीपात्रात चार-पाच दिवसच शहराला पाणी पुरवठा ऐवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरात पाणी टंचाईची बिकट समस्या निर्माण होण्याचीे शक्यता आहे.
या समस्येवर मात करण्यासाठी दुसऱ्यांदा पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडले जाणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.११) पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडले जाणार आहे. कालव्याव्दारे हे पाणी येत्या डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविले जाणार आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी पुजारीटोला प्रकल्पातील पाणी सोडण्यात आले तेव्हाच पाणी पोहचावे यासाठी व्यवस्था करण्यात आली. पहिल्यांदा पुजारीटोला प्रकल्पातून साडे तीन एमएमक्यु पाणी सोडण्यात आले. तर महाराष्ट्र जीवन प्राधीकरणकडून बाघ सिंचन विभागाकडे १० एमएमक्यु पाण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे आता पुन्हा पुजारीटोलाचे पाणी सोडून पाणी टंचाईवर मात केली जात आहे. त्यात आता पावसाळ््यापर्यंत शहराची तहान भागविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणकडून व्यवस्था आली आहे. मात्र यासाठी पाणी सोडण्याची गरज आहे.