गोंदियावासीयांवर यंदाही पाणीटंचाईचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 12:11 AM2018-11-01T00:11:59+5:302018-11-01T00:13:58+5:30
उन्हाळ्याला सुरूवात होण्यास अद्याप तीन ते चार महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. मात्र त्याची झळ आतापासून बसायला सुरूवात झाली आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पाणी पातळीत घट झाल्याने अधेमधे पाणी कपात करण्यास सुरूवात केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : उन्हाळ्याला सुरूवात होण्यास अद्याप तीन ते चार महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. मात्र त्याची झळ आतापासून बसायला सुरूवात झाली आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पाणी पातळीत घट झाल्याने अधेमधे पाणी कपात करण्यास सुरूवात केली. त्यामुळे उन्हाळ्यात शहरात पाणीटंचाईची तीव्र समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
गोंदियापासून १८ कि.मी.अंतरावर असलेल्या वैनगंगा नदीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून शहरवासीयांना पाणी पुरवठा केला जातो. महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाचे शहरात ४० हजारावर ग्राहक आहेत.
त्यांना प्रती व्यक्ती १३५ लीटर याप्रमाणे दिवसांतून दोन वेळा पाणी पुरवठा केला जातो. मात्र मागील महिनाभरापासून शहरवासीयांना अनियमित पाणी पुरवठा केला जात आहे.
पावसाळा संपत असतानाच अनियमित पाणी पुरवठा केला जात असल्याने शहरवासीयांमध्ये खळबळ उडाली आहे. यासंदर्भात प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी यंदा परतीचा पाऊस जिल्ह्यात झाला नाही. त्यामुळे वैनगंगा नदीचे पात्र आत्तापासूनच कोरडे पडले आहे.
परिणामी नदीवर पाणी पुरवठा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विहिरींची पाण्याची पातळी सुध्दा कमी झाली आहे. त्यामुळे शहरवासीयांना नियमित पाणी पुरवठा करण्यात अडचण निर्माण झाली आहे.
यंदा प्रथमच आॅक्टोबर महिन्यातच पाणी पातळी घट झाल्याने पुढील तीन चार महिने कठीण असल्याचे सांगितले. मागीलवर्षी सुद्धा शहरवासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागले होते. तीच परिस्थिती यंदाही निर्माण होण्याची शक्यता आहे.
ग्रामीण भागातही समस्या
जिल्ह्यातील सडक अर्जुनी, तिरोडा तालुक्यातील आठ ते दहा गावांमध्ये आत्तापासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या गावातील महिलांना पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे.
पुजारीटोला धरणावर भिस्त
मागीलवर्षी शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्याने गोंदियापासून ८० किमी अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणातून नहराव्दारे पाणी आणून पाणी आणून शहरवासीयांना पाणी पुरवठा करण्यात आला होता. यंदा सुद्धा पुन्हा तोच प्रयोग करावा लागणार असून त्यादृष्टीने महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाने पाऊले उचलल्याची माहिती आहे.