मनोरा गावात पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 11:59 PM2017-08-14T23:59:32+5:302017-08-15T00:00:56+5:30
तिरोडा तालुक्याच्या जि.प. सरांडी क्षेत्रात दुष्काळसदृश्य परिस्थितीसह पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
काचेवानी : तिरोडा तालुक्याच्या जि.प. सरांडी क्षेत्रात दुष्काळसदृश्य परिस्थितीसह पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. गावातील संपूर्ण विहिरी कोरड्या झाल्या आहेत. हातपंप, सोलरपंप बंद पडले आहेत. महिला शेतातील बोअरवेलचे पाणी आणून जीवनयापन करीत आहेत. तर या क्षेत्रातील सात ते आठ गावांत ५ टक्केच रोवण्या झाल्या आहेत.
मनोरा गाव १७५ घरे व एक हजार ५० लोकवस्तीचे आहे. येथे उन्हाळ्यात पाणी टंचाई असतेच. परंतु आता पावसाळ्यातही पाणी टंचाई दिसून येत आहे. रविवारी (दि.१३) माजी आमदार दिलीप बन्सोड, जि.प. सदस्य मनोज डोंगरे, पं.स. सभापती उषा किंदरले, पं.स. सदस्य मनोहर राऊत, संजय किंदरले आदी पदाधिकाºयांनी भेट देवून गावातील परिस्थितीची पाहणी केली.
गावच्या सरपंच लता राजेश पेशने यांच्या उपस्थितीत पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची पाहणी करण्यात आली. गावात घरगुती विहिरींसह जवळपास २५ विहिरी आहेत. जवळपास विहिरी कोरड्या आहेत. काही विहिरींमध्ये पिण्यायोग्य पाणी नाही. चार ते पाच हातपंप असून पाणी येत नाही. सौर ऊर्जेच्या माध्यमाने नळाची व्यवस्था आहे. मात्र अनेक महिन्यांपासून बंद पडून आहे. जवाहर योजनेंतर्गत शाळेत विहीर आहे. तीसुद्धा जीर्ण असून त्यात घाण आहे.
गावच्या मध्यभागी असलेल्या शासकीय विहिरीत पाण्याचा एक थेंबसुद्धा नाही. गंभीर पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावाला लागून असलेल्या शेतात दोन बोअरवेल आहेत. त्यातून गावातील महिला पिण्याचे पाणी विकत घेवून आणतात. १० रूपयांत दोन ते पाच गुंड पाणी संबंधित शेतकºयाकडून विकत आणावे लागते. सदर शेतकरी विद्युत बिलाच्या नावावर पैसे घेतो, अशी माहिती तेथील नागरिकांनी दिली.
मनोरा येथे पिण्याच्या पाण्याची समस्या जानेवारी महिन्यापासूनच उद्भवते. पावसाळ्यात पाऊस न पडल्याने आता ही गंभीर समस्या निर्माण झाल्याचे सरपंच लता पेशने यांनी सांगितले. पाऊस पडला नाही तर पिण्याच्या पाण्यासाठी गाव सोडावे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्याकरिता तिरोडा पंचायत समिती व तहसीलदारांंना अनेक पत्र देण्यात आले. आमदार, खासदार यांच्यासह अनेक पदाधिकाºयांनाही पत्र देण्यात आले. परंतु कोणत्याही नेत्याने किंवा अधिकाºयाने भेट देवून समस्या जाणून घेण्याचा किंवा सोडविण्याचा प्रयत्न केला नाही, असे सरपंच लता पेशने यांनी माजी आ. दिलीप बन्सोड यांच्यासह उपस्थितांना सांगितले.
मनोरा येथे पाण्याच्या समस्येची पाहणी करताना सरपंच लता पेशने, सदस्य मनोहर धार्मिक, महेंद्र मारवाडे, विश्वनाथ रामटेके, संजर मारवाडे, बळीराम पेशने, तंमुसचे अध्यक्ष लिलाधर तिडके, विनायक सोनवाने, बबलू बोंदरे, महेश लांजेवार, तुकाराम धांदरे, विनोद पेशने, गुलजार गणवीर, सुभाष वाघाडे, गणेश वाघाडे, गुणी गाढवे, ललीत मारवाडे, शशी मारबदे, गोपिका मारवाडे, कांता कावळे, ममता पेशने, लीला पेशने, जेली ओंकार, शकुंतला वाघाडे, वर्षा रामटेके, रामाजी तिडके, रामप्रसाद चामट, जानसा धार्मिक व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरपंचांच्या घरून पाण्याची सोय
सरपंच लता पेशने यांच्या घरी विहिरीला पाणी नाही. परंतु घरी असलेल्या बोअरवेलचे पाणी विहिरीत घातले जाते. त्या विहिरीतील पाणी गावकºयांना पिण्यासाठी दिले जात आहे. शेतातील दोन पंप व सरपंच यांच्या घरच्या विहिरीतून संपूर्ण गावाची तहान भागविली जात आहे. जर त्यांनी पाणी देण्यास नकार दिला तर संपूर्ण गावकºयांवर पिण्याच्या पाण्यासाठी गाव सोडण्याची पाळी येऊ शकेल.
शाळेत पिण्याच्या पाण्याचा अभाव
शाळेत जवाहर योजनेची विहीर असून ती जीर्ण आहे. त्यात घाण साचलेली आहे. बोअरवेलची व्यवस्था करण्यात आली. पण पाणी नसल्याने ती बंद पडून आहे. सोलर योजनेचे नळ बंद असल्याने सरपंच पेशने यांच्या घरून बोअरवेलचे पाणी पोषण आहार शिजविण्यासाठी आणले जात आहे.
७ टक्के गावांत ५ टक्के रोवण्या
सरांडी व मुंडीकोटा क्षेत्रात पूर्णत: दुष्काळी परिस्थिती आहे. सेलोटपार, मुरमाडी, खैरी, मनोरा, मुरपार, नवेगाव, केसलवाडा, बयवाडा, खोपडा, मुंडीकोटा, बिरोली, चांदोरी या गावांत आतापर्यंत केवळ ५ टक्के रोवण्या झालेल्या आहेत. यापैकी केवळ तीन गावांत १० ते १५ टक्के रोवण्या झाल्याचे शेतकºयांनी सांगितले. उर्वरित ९५ टक्के रोवण्या लावण्याची वेळ संपली असून आता रोवण्या लावणार नसल्याचे शेतकरी म्हणाले. काही शेतकºयांची १० ते १५ एकर शेती असून त्यांनी एक बांधीसुद्धा लावली नाही.
जलशिवार योजना केवळ कार्यकर्त्यांना खुश करणारी
संपूर्ण जिल्ह्यात जलशिवार योजनेचे स्तुतीगान होत आहे. जलशिवार योजना सुखी समृद्ध करणारी आहे तर आज संपूर्ण जिल्ह्यात शेतकरी का रडत आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या कशी व का निर्माण झाली. शेतकºयांच्या योजना कशा थांबल्या आहेत. पाण्याच्या पातळीत वाढ का झाली नाही. असे प्रश्न माजी आ. दिलीप बन्सोड यांनी उपस्थित करून योजना शेतकºयांच्या नव्हे तर सरकारच्या हिताची आहे, स्वत:च्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शेतकºयांच्या नावावर स्वत:च्या घरात निधी वळविण्याची योजना आखली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पाणी समस्या सोडविण्यासाठी आम्ही अनेक निवेदने दिलीत. मात्र अधिकारी व नेत्यांनी लक्ष दिले नाही.
-लता पेशने, सरपंच, मनोरा.
माझ्याकडे १४ एकर शेती असून एकही लावली नाही. पेरण्या वाळत आहेत. त्यामुळे यंदा आर्थिक नुकसान सहन करावे लागेल.
-विनायक सोनवाने, शेतकरी, मनोरा.
पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्येची माहिती मिळताच भेट देण्यासाठी गेलो. यात मनोरा गावाची व परिसराची अतिशय वाईट स्थिती असल्याचे जाणवले. याबाबत तालुका व जिल्हा प्रशासनाला कळविले आहे.
-दिलीप बन्सोड, माजी आमदार, तिरोडा
माझ्याकडे अशा समस्येची तक्रार आली नाही. माजी आ. दिलीप बन्सोड यांच्या माध्यमातून माहिती मिळाली आहे. मी स्वत: काळजी घेणार.
-संजय रामटेके, तहसीलदार, तिरोडा.