भर पावसाळ्यात पाणीटंचाईची समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 10:03 PM2017-09-14T22:03:31+5:302017-09-14T22:04:02+5:30
मागील तीन चार दिवसांपासून शहरी आणि ग्रामीण भागात पाच ते सहा तासांचे भारनियमन सुरू झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील तीन चार दिवसांपासून शहरी आणि ग्रामीण भागात पाच ते सहा तासांचे भारनियमन सुरू झाले. याचा सर्वाधिक फटका पाणी पुरवठा योजनांना बसला. परिणामी भर पावसाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात आहे.
गोंदिया, तिरोडा, गोरेगाव येथे महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागातंर्गत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. प्राधिकरणाचे गोंदिया शहरात १३ हजार ५०० तर तिरोडा येथे २ हजार ५०० आणि गोरेगाव, मुंडीपार, भंडगा येथे ११५० ग्राहक आहेत. प्राधिकरणाच्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत प्रतीव्यक्ती १३५ लिटर याप्रमाणे दिवसांतून दोनदा पाणी पुरवठा केला जातो. याच पाणी पुरवठ्यावर तिन्ही ठिकाणच्या नागरिकांची पाण्याची गरज भागविली जाते.
उन्हाळ्यात देखील या भागात नियमित पाणी पुरवठा केला जातो. मात्र सध्या पावसाळा सुरू असताना नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर भटकंती करण्याची वेळ आली आहे. राज्यातील वीज निर्मिती केंद्रांना केला जाणार कोळश्याचा पुरवठा ठप्प झाल्याने त्याचा वीज निर्मितीवर परिणाम झाला.
एकूण मागणीच्या तुलनेत वीज निर्मिती कमी असल्याने महावितरणने ९ सप्टेबरपासून राज्यात भारनियमन सुरू केले. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील नागरिकांना बसत आहे. या भागात पाच ते सहा तासांचे भारनियमन केले जात असल्याने पाणीटाक्या भरणे शक्य होत नाही. गोरेगाव येथे गेल्या दोन दिवसांपासून पाणी पुरवठाच झाला नाही. तर तिरोडा येथे दिवसांतून केवळ एकदाच पाणी पुरवठा होत आहे.
भारनियमनात वाढ झाल्यास गोंदिया शहराला सुध्दा त्याचा फटका बसू शकतो. भारनियमनामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.
दिवाळीनंतर पाणीकपातीचे संकट
यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी नदी, नाले, तलाव कोरडे पडले आहे. जलाशयांमध्ये देखील मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. वैनगंगा नदीचे पात्र देखील कोरडे असून दिवाळीनंतर शहराला केल्या जाणाºया पाणी पुरवठ्यात कपात होण्याची शक्यता महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाºयांनी वर्तविली आहे.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून अनेक भागात साथरोगांनी थैमान घातले आहे. दूषित पाण्यामुळेच सर्वाधिक साथरोगांची लागण होते. आता भारनियमनामुळे नागरिकांना विहिरी, बोअरवेल आणि अन्य स्त्रोतांवर अवलंबून राहावे लागते आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
मागील तीन चार दिवसांपासून सुरू झालेल्या भारनियमनामुळे पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. भारनियमनामुळे गोरेगाव येथे दोन दिवसांपासून पाणी पुरवठा करता आला नाही.
- राजेंद्र मडके,
उपविभागीय अभियंता,
महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभाग.