पाणीटंचाई प्रश्नी जिल्हाधिकारी अॅक्शन मोडवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 09:21 PM2019-05-10T21:21:35+5:302019-05-10T21:22:08+5:30
उन्हाळ्याला सुरूवात होण्यापूर्वी पाणीटंचाई निवारणार्थ उपाय योजना करण्यात यंदा प्रशासन पूर्णपणे फेल ठरले. त्यामुळे जिल्ह्यावासीयांना पाणी टंचाईच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पाणी टंचाईचा विषय लोकमतने लावून धरल्यानंतर जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे या अॅक्शन मोडवर येत गुरूवारी (दि.९) जिल्ह्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांना भेट देवून पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : उन्हाळ्याला सुरूवात होण्यापूर्वी पाणीटंचाई निवारणार्थ उपाय योजना करण्यात यंदा प्रशासन पूर्णपणे फेल ठरले. त्यामुळे जिल्ह्यावासीयांना पाणी टंचाईच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पाणी टंचाईचा विषय लोकमतने लावून धरल्यानंतर जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे या अॅक्शन मोडवर येत गुरूवारी (दि.९) जिल्ह्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांना भेट देवून पाहणी केली. तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना उपाय योजना करण्याचे निर्देश दिले.
भूजल सर्वेक्षण विभागाने पाणी टंचाईचा संभाव्य आराखडा जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे सादर केल्यानंतर तो आराखडा जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करुन उपाय योजना करण्याची गरज होती. मात्र जि.प.ग्रामीण पुरवठा विभागाने यंदा लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या नावावर दोन महिने वेळमारून नेली. त्यामुळे जिल्ह्यातील ३९८ गावांतील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागले. तर सहा गावातील नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली. अनेक गावातील महिलांना पहाटेपासूनच पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. दरम्यान या सर्व प्रकारानंतर प्रशासनाचा अनागोंदी कारभार पुढे आला. यावर ओरड वाढल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी गुरूवारी (दि.९) देवरी तालुक्यातील शिलापूर, बोरगाव, आमगाव तालुक्यातील अंजोरा जिल्हा परिषद क्षेत्रात येत असलेल्या वागडोंगरी, बाघाटोला व रामाटोला या गावांना भेट देऊन बोअरवेल आणि विहिरीची पाहणी करुन उपाय योजना करण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. नवीन बोअरवेल व जुन्या बोअरवेलासाठी पाईप पुरवठा करण्यास सांगितले.
२०१९ च्या पाणी टंचाई आराखड्यातील पहिल्या टप्यात ज्या २५ गाव-वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सावरी, खामकुरा, झाशीनगर, पिपरखारी इंदिरानगर, आमगाव, मांगोटोला, महाका उचेपूर, जेठभावडा, बोरगाव शिलापूर, टेकरी, बुराडीटोला, डोंगरगाव, जवरी, शिवनटोला, शिवनी, खुर्सीपारटोला, खुर्शीपार, ठाणा, आसोली, जांभुरटोला, तिगाव, बघेडा, वडद, सोनेखारी, पाऊडदौना या गावांचा समावेश आहे.
यापैकी काहीं गावांना जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करुन वस्तू स्थिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता हितेंद्र चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हाश्मी, वरिष्ठ भुजलवैज्ञानिक नंदकिशोर बोरकर, उपविभागीय अधिकारी राठोड यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य जियालाल पंधरे, रामाटोल्याच्या सरपंच संगिता ब्राम्हणकर, पाऊळदौन्याचे सरपंच खेमराज उईके, तहसीलदार, गटविकास अधिकारी उपस्थित होते.