निर्जंतुकीकरण करूनच पाणीपुरवठा करावा; जीबीएसचा प्रादुर्भाव बघता जिल्हा विभाग सतर्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 16:43 IST2025-02-19T16:40:36+5:302025-02-19T16:43:12+5:30
मुरुगानंथम : साथरोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना करा

Water should be supplied only after disinfection; District department alert in view of GBS outbreak
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम (जी.बी.एस.) विषाणू तसेच अन्य साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव थांबविण्याकरिता पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण, तपासणी, परिसराची स्वच्छता, पाणीपुरवठा योजनांमधील गळती, पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण, स्त्रोतांचे संरक्षण व आरोग्याबाबत जनजागृती करणे हे ग्रामपंचायतस्तरावर होणे आवश्यक आहे. त्याकरिता पिण्याच्या पाण्याचे सर्व स्त्रोत, वितरण व्यवस्था, शाळा, अंगणवाडी, घरांना नळाद्वारे मिळणाऱ्या पाणी नमुन्यांची गावातील प्रशिक्षित महिला स्वयंसेवकांमार्फत प्रत्येक महिन्यातून एकदा जैविक व रासायनिक परीक्षण क्षेत्रीय तपासणी संचाद्वारे करावी, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी केल्या.
जिल्ह्यात शुद्ध पाणीपुरवठा होण्याच्या अनुषंगाने गाव पातळीवर नळ पाणीपुरवठा योजनांचे सर्व स्रोत शाळा, अंगणवाडी व नळाद्वारे घरामध्ये उपलब्ध होणारे पाणी यांच्या जैविक तपासणीसाठी आवश्यक पाणी नमुने अभियान स्वरूपात गोळा करून नजीकच्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या प्रयोगशाळेमध्ये जमा करावे. जीबीएस व अन्य साथरोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयोगशाळेत जैविक तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
जिल्हा परिषद पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने जीबीएस व अन्य साथ रोगांना लक्षात घेत आयोजित सभेत ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी ग्रामीण भागात पाणी गुणवत्ता राखण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यात, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होण्याबाबत दक्षता घेण्यात यावी. जीबीएस व अन्य साथ रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, शिक्षण, आरोग्य, ग्रामपंचायत विभागाच्या समन्वयाने विविध उपक्रम घेण्याबाबत पंचायत समिती व ग्रामपंचायतींना आवश्यक ती कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या.
प्रति व्यक्ती ५५ लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा करा
ग्रामीण भागात कुटुंबाला कार्यात्मक घरगुती नळ जोडणीद्वारे पुरेशा प्रमाणात किमान ५५ लिटर प्रतिदिन प्रति व्यक्ती विहित गुणवत्ता पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी केंद्र, आरोग्य केंद्र, उपकेंद्र इत्यादी ठिकाणी सातत्य व गुणवत्तापूर्वक शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. त्याप्रमाणे ग्रामीण जनतेला गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रम ग्रामीण भागातील गावागावांत राबविण्यात येणार आहे.
संशयित आढळल्यास विभागाला माहिती द्या
जीबीएसचे रुग्ण ज्या गावात संशयित किंवा निदर्शनास आल्यास तात्काळ माहिती जिल्हास्तरावर प्रा.आ. केंद्र मार्फत कळविण्यात यावी व त्वरित उपाययोजना करण्यात यावी. त्या गावातील सर्व स्त्रोतांचे पाणी शुद्धीकरण करुन तात्काळ पिण्याच्या पाण्याचे सर्व नमुने गोळा करुन प्रयोगशाळेत पाठविण्यात यावे.
"जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता पंचायत, आरोग्य, शिक्षण व पाणीपुरवठा विभागाच्या समन्वयाने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी काटेकोरपणे अभियान स्वरुपात करुन जीबीएस विषाणू व इतर कोणत्याही साथ रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. या कामात कुचराई केल्यास संबंधितावर कार्यवाही करण्यात येईल."
- एम. मुरुगानंथम, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. गोंदिया