शहरात ८ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:27 AM2021-03-20T04:27:22+5:302021-03-20T04:27:22+5:30
आमगाव : शहरातील रेल्वे स्टेशन ते लांजी मार्गावरील बाघ नदीपर्यंत रस्त्याचे काम सुरू असून या कामावर होत असलेल्या जेसीबीच्या ...
आमगाव : शहरातील रेल्वे स्टेशन ते लांजी मार्गावरील बाघ नदीपर्यंत रस्त्याचे काम सुरू असून या कामावर होत असलेल्या जेसीबीच्या वापरामुळे पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे. परिणामी मागील ८ दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा बंद आहे. यामुळे शहरात पाण्यासाठी हाहाकार माजला आहे.
या रस्त्याच्या कामावर जेसीबीचा वापर केला जात असल्याने पाण्याची पाईप लाईन वारंवार फुटत असून पाणीपुरवठा बंद पडतो. नगर परिषदेचे कर्मचारी पाईपलाईनची दुरुस्ती करतात मात्र परत तोच प्रकार घडत असून यात मात्र शहरवासीयांची पंचाईत होत आहे. रस्त्याच्या कामावर योग्य ती खबरदारी घेतल्यास पाईपलाईन फुटणार नाही व पाणीपुरवठा बंद पडणार नसल्याचे शहरवासीयांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, आता उन्हाळ्याचे दिवस सुरू असून त्यात पाणीपुरवठा वारंवार बंद पडत असल्याने शहरवासी चांगलेच त्रासले असून नाराजही आहेत. मात्र लोकप्रतिनिधींचे या प्रकाराकडे दुर्लक्ष आहे. तसेच नगर परिषद प्रशासकांकडूनही काहीच कारवाई करण्यात आली नाही. यात मात्र शहरवासीयांची फसगत होत आहे.