विहिरीतील गाळामुळे पाणी पुरवठा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:21 AM2018-04-14T00:21:55+5:302018-04-14T00:21:55+5:30
येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीतील गाळाचा बऱ्याच कालावधीपासून उपसा न केल्याने पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी शहरवासीयांना पाणी टंचाईच्या संकटाला तोंड देण्याची वेळ आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीतील गाळाचा बऱ्याच कालावधीपासून उपसा न केल्याने पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी शहरवासीयांना पाणी टंचाईच्या संकटाला तोंड देण्याची वेळ आली आहे. स्थानिक प्रशासनाचा भोंगळ कारभार पुढे आला आहे.
आमगाववासीयांना मागील महिनाभरापासून पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच शहराला पाणी पुरवठा करणाºया विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने मागील तीन दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. उन्हाळ्याला सुरूवात होण्यापूूर्वीच स्थानिक प्रशासनाने उपाय योजना करण्याची गरज होती. पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीतील गाळाचा उपसा करण्याची गरज होती. मात्र याकडे दुर्लक्ष करीत वेळ मारून नेल्याने त्याचा फटका शहरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावे, यासाठी नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. परंतु वाढीव पाणी पुरवठा योजनेची क्षमता चार लाख लिटर आहे.
मात्र शहराला सध्या केवळ २ लाख ५० हजार लिटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. दररोज जवळपास दीड लाख लिटर पाणी शहरवासीयांना कमी मिळत असल्याने त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे.
गाळाचा उपसा करण्याकडे दुर्लक्ष
बाघ नदीच्या पात्रालगत उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून शहरवासीयांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र पाणी पुरवठा योजनेची विहीर आता कालबाह्य झाली असून त्यातील गाळाचा स्थानिक प्रशासनाने अनेक वर्षांपासून उपसा केला नाही. त्यामुळे पाणी टाकीची साठवण क्षमता कमी झाली आहे. त्यातच विहिरीतील गाळामुळे तीन दिवसांपासून शहराला होणारा पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. प्रशासनाने वेळीच उपाय योजना केली असती तर शहरवासीयांवर पाणी टंचाईचे संकट ओढवले नसते.