सलग दुसऱ्याही दिवशी पाणी पुरवठा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2015 02:09 AM2015-12-09T02:09:04+5:302015-12-09T02:09:04+5:30
महाराष्ट्र जीवन प्राधीकरणला शासनात नियमित सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून सुरू केलेले काम बंद आंदोलन दुसऱ्याही दिवशी सुरू होते.
संपाचा फटका : मजीप्राच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आंदोलन
गोंदिया : महाराष्ट्र जीवन प्राधीकरणला शासनात नियमित सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून सुरू केलेले काम बंद आंदोलन दुसऱ्याही दिवशी सुरू होते. त्यामुळे गोंदिया शहरासह तिरोडा आणि गोरेगाव येथील पाणी पुरवठा ठप्प झाला आहे.
अचानक पुकारलेल्या या काम बंद आंदोलनामुळे शहरातील नागरिकांची चांगलीच फजिती झाली. कुठलीही पूर्वसूचना नसल्यामुळे नागरिकांना नळाला पाणी येणार नाही याची माहिती नव्हती. त्यामुळे नागरिकांना बकेट्स घेऊन हातपंपांवर धाव घ्यावी लागली. सोमवारनंतर मंगळवारीही ही स्थिती कायम होती. रात्री मुख्यमंत्र्यांशी बैठक सुरू होती. (जिल्हा प्रतिनिधी)
गोंदिया नगर परिषदेचे ‘आॅन कॉल’ टँकर
पाण्यासारखी आवश्यक बाब नागरिकांना मिळावी यासाठी उपविभागीय अधिकारी केएनके राव यांनी नगर परिषद मुख्याधिकारी व संबंधितांची बैठक घेऊन पर्यायी व्यवस्था करण्याची सूचना केली. न.प.च्या कर्मचाऱ्यांनी जीवन प्राधीकरणच्या नळ योजनेचे संचालन करण्याचा प्रयत्नही केला. पण तांत्रिकदृष्ट्या सक्षम कर्मचारी नसल्यामुळे न.प.चा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही.
गोंदिया शहरात टँकरने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी कंत्राटदाराचे ७ टँकर, २ नगर परिषदेचे टँकर आणि ४ फायर ब्रिगेडच्या गाड्यांमधून मंगळवारी काही भागात पाणी पुरवठा करण्यात आला. मात्र ही व्यवस्था अतिशय तोकडी पडली. ज्या नगरसेवकांनी टँकरची मागणी केली त्याच भागात हे टँकर पुरविण्यात आले.