शहरातील आठ वॉर्डांमध्ये टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 09:42 PM2019-06-05T21:42:28+5:302019-06-05T21:42:54+5:30

शहरात पाण्याची भिषण टंचाई असताना प्रादेशीक पाणी पुरवठा योजना ही कुचकामी ठरत आहे. शहरात एकुण १७ प्रभाग असून गोरेगाव शहराला कटंगी डॅम येथे उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाणी पुरवठा केला जातो.

Water supply to tankers in eight wards in the city | शहरातील आठ वॉर्डांमध्ये टँकरने पाणीपुरवठा

शहरातील आठ वॉर्डांमध्ये टँकरने पाणीपुरवठा

Next
ठळक मुद्देयोजना कुचकामी : पाणीटंचाईच्या समस्येत वाढ

दिलीप चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : शहरात पाण्याची भिषण टंचाई असताना प्रादेशीक पाणी पुरवठा योजना ही कुचकामी ठरत आहे. शहरात एकुण १७ प्रभाग असून गोरेगाव शहराला कटंगी डॅम येथे उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाणी पुरवठा केला जातो. पण तांत्रीक कारणामुळे नळाद्वारे पाणी पुरवठा बंद झाल्याने शहरातील आठ वार्डांना नगरपंचायतव्दारे टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. लोकमतने बुधवारी (दि.५) सकाळी टँकरवारीचा आढावा घेतला.
शहरातील आठ वार्डातील विहिरींसह बोअरवेलनी सुध्दा तळ गाठल्यामुळे वार्डा-वार्डात पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आहे. नगरपंचायतीचा टँकर आल्यावर काही भागात नगराध्यक्ष आशिष बारेवार यांच्यासह नगरसेवक टँकरसोबत जात असल्याचेही आढळले. वार्डातील प्रत्येक कुटुंबाला पाणी पुरवठा व्हावा, यासाठी प्रयत्न असल्याचे बारेवार यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले. मात्र प्रादेशीक पाणी पुरवठा योजनेच्या मोटार दुरुस्तीचे काम पूर्ण झाले तर शहराला पाणी पुरवठा होईल आणि टँकर बंद होतील. पण जोपर्यंत प्रादेशीक पाणी पुरवठा करणारी यंत्रणा सक्षम होणार नाही तोपर्यंत टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरुच राहील असे सांगितले. गोरेगाव शहरात हलबीटोला व श्रीरामपूर या दोन वार्डात प्रादेशीक पाणी पुरवठा योजनेची जलवाहिनी नाही.त्यामुळे या दोन वार्डात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नगरपंचायतीने गेल्या दीड महिन्यापासून टँकरने पाणी पुरवठा सुरु ठेवला आहे. मात्र उर्वरित सहा वार्डात काही तांत्रीक कारणामुळे मोटार बिघाडीचे कारण पुढे करुन गेल्या दोन दिवसापासून प्रादेशिक पाणी पुरवठा यंत्रणाने पाणी पुरवठा बंद केला आहे. त्याची झळ नगरपंचायतीला बसत आहे. पाणी टंचाईची समस्या लक्षात घेता बारेवार यांनी वार्डा-वार्डाचा आढावा घेऊन पाणी समस्येवर मात करण्यासाठी उपाय योजना सुरू केल्या आहे.
टँकर आल्यावरच मुलांची आंघोळ
गोरेगाव शहरातील आठ वार्डात पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आहे. नगर पंचायतीद्वारे टँकरद्वारे पाणी पोहोचविण्याचे काम सुरु असले तरी नगरपंचायतीला अनेक संकटांना तोंड दयावे लागत आहे. दोन-चार दिवसांपासून विद्युत विभागानेही पावसाळ्यापूर्वीची कामे करण्यासाठी काही वेळासाठी विद्युत कपात केली आहे. त्यामुळे नगरपंचायतीला टँकर भरताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. काही वार्डात नगरपंचायतीचा टँकर पोहोचल्यावरच मुलांची आंघोळ करुन दिली जात असल्याचे चित्र पाहयला मिळाले.
पाणीदार गाव तरी पाणीटंचाई
गोरेगाव शहर दहा हजार लोकवस्तीचे गाव आहे.गावाला लागूनच कटंगी डॅम आहे. त्यामुळे हे गाव तसे पाणीदार आहे. पण शेतातील तीनशे-चारशे फुटापर्यंत खोदलेल्या बोरवेलमुळे येथे पाणीटंचाई निर्माण होत असल्याचे बोलले जाते. तर दुसरीकडे पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरत आहे. प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनची गळती खरी डोकेदुखी आहे. विशेष म्हणजे प्रादेशीक पाणी पुरवठा यंत्रणेकडे कुणाचे फारसे लक्ष नाही, त्यामुळे इथे सर्व गौडबंगाल सुरु आहे.
पाणीपुरवठा योजना न.प.ला हस्तांतरित करा
प्रादेशिक पाणी पुरवठा यंत्रणा गेल्या दहा-पंधरा वर्षापासून शहरात कार्यरत आहे. मात्र नियोजनाअभावी या योजनेला अखेरची घरघर लागली आहे. उन्हाळा सोडा साध्या पावसाळ्यात पाणी पुरवठा यंत्रना नागरिकांना मुबलक पाणी देण्यास असमर्थ ठरत आहे. त्यामुळे सदर प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे नगरपंचायतकडे हस्तांतरित करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
१५ वर्षानंतर प्रथमच साफसफाई
गोरेगाव शहरातील ३५ विहिरींचा गाळ काढून प्रथमच साफसफाई करण्यात आली.नगरपंचायतीने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सदर मोहिम हाती घेतली. बऱ्याच विहिरीतून ३०० ते ४०० फुट गाळ काढण्यात आला.

वार्डातील कोणत्याही कुटुंबातील नागरिकांना पाणी टंचाईची झळ बसणार नाही.पाणी टंचाईच्या समस्येवर लवकरच तोडगा काढला जाईल.सार्वजनिक विहिरींच्या स्वच्छतेची मोहिम हाती घेण्यात आली आहे. शहरातील ३५ विहिरींची सफाई करण्यात आली आहे.नव्या २३ बोअरवेल्स मंजूर झाल्या आहेत.
- आशिष बारेवार
नगराध्यक्ष न.प.गोरेगाव.

Web Title: Water supply to tankers in eight wards in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.