साकोलीचा पाणीपुरवठा होणार बंद
By admin | Published: January 12, 2016 01:35 AM2016-01-12T01:35:57+5:302016-01-12T01:35:57+5:30
सेंदुरवाफा व साकोली या दोन्ही गावांची पाणी पुरवठा करणारी योजना आता कायमस्वरुपी बंद होणार आहे.
जलकुंभाची साठवण क्षमता कालबाह्य : ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे पत्र
संजय साठवणे साकोली
सेंदुरवाफा व साकोली या दोन्ही गावांची पाणी पुरवठा करणारी योजना आता कायमस्वरुपी बंद होणार आहे. त्यामुळे साकोली व सेंदुरवाफा येथे ऐन हिवाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. येत्या १५ जानेवारीपासून साकोलीचा पाणी पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचे पत्र ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग जिल्हा परिषद भंडारा यांनी नगर पंचायत साकोलीला दिले आहे. त्यामुळे साकोलीवासियांच्या समस्येत भर पडणार आहे.
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग साकोलीतर्फे साकोली व सेंदुरवाफा या दोन्ही गावाना पाणी पुरवठा करण्यात येत होता. यासाठी एम. बी. पटेल महाविद्यालय साकोलीच्या मागे असलेल्या टेकडीवर पाण्याचे जलकुंभ तयार करण्यात आले होते. उर्वरित साकोली येथील काही वार्डासाठी लाखांदुर मार्गावर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या बाजुलाच एक पाण्याचे जलकुंभ आहे. या दोन्ही टाकीतुन साकोली व सेंदुरवाफा या दोन्ही गावांना पाणीपुरवठा होत होता. मात्र सात-आठ वर्षाआधी महामार्ग चौपदरीकरणाचे काम करण्यात आले. या कामादरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या कामात सेंदुरवाफा येथे जाणारी पाईपलाईन निकामी झाली तेव्हापासुन सेंदुरवाफा येथील पाणीपुरवठा बंद आहे.
साकोली येथील कॉलेजच्या मागील बाजुला असलेली पाईपलाईन ठिकठिकाणी बुझल्यामुळे व लोकांची घरे झाल्यामुळे बरीच पाईप लाईन निकामी झाली परिणामी टेकडीवरील टाकीत पाणी आणावे बंद झाले त्यामुळे साकोली येथील फक्त तलाव व गणेशवॉर्ड या दोन वॉर्डातील पाणीपुरवठा या विभागामार्फत सुरु होता. मात्र सदर योजनेची पाईप लाईन व पाण्याची टाकी जीर्ण झाली त्यामुळे पाणी पुरवठा विभागाने ३० आॅक्टोंबर २०१५ रोजी डॉ. एस. एस. कुलकर्णी (नागपुर) यांनी साकोली सेंदुरवाफा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत या जलकुंभाचे सर्व्हेक्षण केले.
या सर्व्हेक्षणानुसार सदर जलकुंभाला ४० वर्ष पुर्ण झाली असून टाकीला ‘लिकेजेस’ असल्याचे पाहणीनंतर दिसून आले. त्यामुळे सदर टाकी वापरण्यात येऊ नये व जलकुंभ लवकरात लवकर जमीनदोस्त करण्यात यावे असे सुचविले आहे.
या अहवालावरुन ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता यांनी येत्या १५ तारखेपासुन साकोलीचा पाणीपुरवठा बंद करण्यात येईल. या आशयाचे पत्र नगर पंचायत प्रशासक साकोली यांना दिले व पुढे पाण्याची सोय करावयाची असल्यास महाराष्ट्र जीवन प्राधीकरण यांचेशी संपर्क साधावे असेही नमुद करण्यात आले आहे.
त्यामुळे ऐन मकर संक्रातीला सणासुदीच्या दिवसातच साकोलीचा पाणी पुरवठा बंद होणार असल्याने सणाच्या आनंदोत्सवात विजण पडेल यात शंका नाही.