पावसाळ्यापर्यंत पाण्याची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:29 AM2018-04-21T00:29:14+5:302018-04-21T00:29:14+5:30
येथून सुमारे ९० किमी अंतरावरील पुजारीटोला धरणातून सोडण्यात आलेले पाणी डांगोरली जवळील वैनगंगा नदीत पोहोचले. यामुळे पावसाळ््यापर्यंत शहरवासीयांना पुरवठ्यासाठी पाण्याची व्यवस्था झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथून सुमारे ९० किमी अंतरावरील पुजारीटोला धरणातून सोडण्यात आलेले पाणी डांगोरली जवळील वैनगंगा नदीत पोहोचले. यामुळे पावसाळ््यापर्यंत शहरवासीयांना पुरवठ्यासाठी पाण्याची व्यवस्था झाली आहे. मात्र पाण्याचा जपूनच वापर व्हावा यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणकडून शहरात एकच वेळ पाणी पुरवठा केला जाणार आहे.
शहराला डांगोरली येथून पाण्याचा पुरवठा होत असून वैनगंगा नदीत पाण्याचा साठाच नसल्याने पुजारीटोला प्रकल्पातून गोंदिया शहरासाठी पाणी सोडण्यात आले होते. मात्र अंभोरा जवळ कालवा फुटल्याने बाघ प्रकल्प विभागाने पुन्हा १५ तारखेला सकाळी पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडले. सोडलेले पाणी डांगोरली जवळील वैनगंगा नदीत बुधवारी (दि.१८) रात्री १२ वाजतादरम्यान पोहचले. ९० किमी अंतर पार करायला चार दिवस लागले. विशेष म्हणजे, या दरम्यान जिल्ह्यातील अनेक भागांत पाऊस पडला होता. त्यामुळे जास्त पाणी नदी नाल्यांनी सोखले नाही. अन्यथा आणखी एक दिवस पाण्याला डांगोरली पर्यंत पोहचण्यासाठी लागला असता.
पुजारीटोला प्रकल्पातील पाणी नदीत १५ दिवसांसाठी संग्रहीत करण्याचे आदेश आहेत. सिंचन विभागाला पाणी बंद करण्याची सूचना तीन दिवसांपूर्वीच द्यायची आहे. अशात जर पुन्हा शहरासाठी पाणी हवे असल्यास त्याबाबतही तीन दिवसांपूर्वी सूचना द्यावी लागणार आहे. सध्या पाण्याची व्यवस्था झाली आहे, मात्र पाण्याचा अपव्यय होवू नये या दृष्टीने शहरात एकच वेळ पाणी पुरवठा करण्याचा निर्णय महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे.
विशेष म्हणजे, पुजारीटोला प्रकल्पातील पाणी नदीत येण्या पुर्वी फक्त चार-पाच दिवस एक वेळ पाणी पुरवठा करता आला असता एवढेच पाणी नदीत होते. शिवाय यावर्षी पहिल्यांदाच नदीच्या आता बनलेल्या इनवेलचे गेट तोडून पाणी पुरवठा करण्याची नौबत आली असल्याचे मजिप्राचे उपविभागीय अभियंता राजेंद्र मडके यांनी सांगीतले. मात्र सध्या नदीत १० सेमी. वाढले असल्याचेही त्यांनी सांगीतले.
पडली असती १४७ जेसीबींची गरज
नदीतील पाणी संपल्याची माहिती मिळाल्यावर जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी ५ एप्रिल रोजी डांगोरली जवळील वैनगंगा नदीचे निरीक्षण केले. याप्रसंगी त्यांनी पुजारीटोला प्रकल्पाचे पाणी नदीत संग्रहीत करण्यासाठी तलावासारखा लांब व एक फुट खोल खड्डा तयार करण्याची सूचना दिली होती. या प्रस्तावावर गांभीर्याने विचार केला असता या कामासाठी सुमारे १४७ जेसीबी लागणार होते. शिवाय पुजारीटोलाचे पाणी नदीत येण्यापुर्वी ही व्यवस्था करणे गरजेचे होते. अशात हा प्रस्ताव बाजूला ठेवावा लागल्याचे शाखा अभियंता ए.वी.बागडे यांनी सांगीतले.