लोकांना पाणी मिळू नये म्हणून फोडली पाण्याची टाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:27 AM2021-05-24T04:27:51+5:302021-05-24T04:27:51+5:30
गावात पाणी टंचाई भेडसावू नये व गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी मक्काटोला येथे वाॅर्ड क्रमांक-१ मध्ये पाच हजार लीटरची ...
गावात पाणी टंचाई भेडसावू नये व गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी मक्काटोला येथे वाॅर्ड क्रमांक-१ मध्ये पाच हजार लीटरची पाणी टाकी लोखंडी स्टँडवर बसविण्यात आली आहे. बोअरवेलला इलेक्ट्रिक पंप जोडून पाणी भरणे आणि नळ योजनेद्वारे पाणी पुरवठा करणे सुरू होते. मात्र, अचानक शुक्रवारी (दि.२१) गावातीलच रवींद्र बडोले हातात कुऱ्हाड घेऊन थेट पाणी टाकीच्या स्टँडवर चढला आणि कुऱ्हाडीने वार करून टाकी फोडली. ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईत तो टाकी फोडत असताना सुखदास सहारे, पूरन सहारे, विद्यानंद बडोले व शेजारी असलेल्या अनेकांनी त्याला बघून हटकले.
पण त्याने ‘मी फोडतो तुम्ही फोटो काढा, व्हिडिओ बनवा आणि जे बनते ते करा,’ असे म्हणाल्याचे तक्रारीत नमूद आहे. वाॅर्ड क्रमांक-१ च्या सदस्य देशप्रेमी विलास बडोले यांनी घटनेची माहिती सर्वप्रथम सरपंच दोनोडे यांना दिली. मात्र, सरपंच घटनास्थळी पोहचेपर्यंत आरोपी तिथून निघून गेला होता. यावर सरपंचांनी लगेच सालेकसा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे. एका बाजूला कोरोना संक्रमण तर दुसऱ्या बाजूला पाणी टंचाईचे संकट उभे झाले असल्याने नागरिक दुहेरी संकटात सापडले आहेत. त्यात पाणी टाकी फोडून पाण्याची समस्या निर्माण करण्यात आल्याने गावकऱ्यांची अधिकच फसगत झाली आहे. यासंदर्भात ठाणेदार प्रमोदकुमार बघेले यांच्याशी संपर्क केला असता आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले आहे.