ओवारा धरणातील पाण्याचा अपव्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:24 AM2021-07-25T04:24:44+5:302021-07-25T04:24:44+5:30
साखरीटोला : लघू पाटबंधारे विभाग (देवरी) अंतर्गत येत असलेल्या ओवारा धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. यासाठी अधिकाऱ्यांचा ...
साखरीटोला : लघू पाटबंधारे विभाग (देवरी) अंतर्गत येत असलेल्या ओवारा धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. यासाठी अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा दिसून येतो.
देवरी तालुक्यातील ओवारा येथे धरण तयार करण्यात आले असून, त्याचा परिसरातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होतो. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. धरणात अजूनही पाहिजे तेवढा पाण्याचा साठा संग्रहित झाला नाही; मात्र या धरणाच्या लघू कालव्याद्वारे पाणी वाहत असते. पाण्याचा अपव्यय होत असला तरी अधिकारी-कर्मचारी लक्ष देत नाहीत. लहान-लहान कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. ही बाब कडौतीटोला येथील सुभाषचंद्र बोस पाणी वाटप संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणूून दिली.
मात्र याकडे कानाडोळा करण्यात आला. शेतकऱ्यांच्या हिस्याचे पाणी वाया जाऊ देण्यात अधिकारी धन्यता मानतात. आता पाणी वाया जात असून, रब्बीच्या वेळी पाणीसाठा मुबलक नसल्याची बतावणी करून शेतीला पाणी देणार नाहीत, तसेच या कालव्यावर विना परवानगी काही लोक वीज पंप चालवितात. ही बाबसुद्धा वारंवार संस्थेने लक्षात आणून दिली; मात्र याकडेसुद्धा दुर्लक्ष केले जाते. अशा अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी संस्था अध्यक्ष नंदलाल फुंडे, माधो कोरे, भागवत बागडे यांनी केली आहे.