पाणीच पाणी चोहीकडे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 11:22 PM2019-07-30T23:22:58+5:302019-07-30T23:23:25+5:30
जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. दुष्काळी परिस्थितीत मागील सहा दिवसापासून सुरु असलेल्या या सुखद ‘वर्षा’ वामुळे कोरडेठाक पडलेल्या जलाशयांची पाणी पातळी वाढत आहे. सोमवारी झालेल्या पावसाची जिल्ह्यात सरासरी २६.५४ मिमी. नोंद करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. दुष्काळी परिस्थितीत मागील सहा दिवसापासून सुरु असलेल्या या सुखद ‘वर्षा’ वामुळे कोरडेठाक पडलेल्या जलाशयांची पाणी पातळी वाढत आहे. सोमवारी झालेल्या पावसाची जिल्ह्यात सरासरी २६.५४ मिमी. नोंद करण्यात आली आहे. हिंगणघाट तालुक्यात सर्वाधिक ३७.३० मिमी पावसाची नोेंद केली. या पावसामुळे समुद्रपूर तालुक्यातील लालनाला आणि हिंगणघाट तालुक्यातील नांद प्रकल्पाचे गेट उघडण्यात आले.
यासोबतच वर्धा तालुक्यात २०.८१ मिमी, सेलू ९.८० मिमी, देवळी ३७.१५ मिमी, आर्वी २८.९१ मिमी, आष्टी २४.६६ मिमी, कारंजा १९.०८ मिमी, समुद्रपूर ३५.८६ मिमी पाऊस झाला असून जिल्ह्यात एकूण २१२.३० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पावसामुळे शेतीपिकांना नवसंजीवनी मिळाली असून सध्या काही भागात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
लालनाला प्रकल्पाचे ५ दरवाजे २५ सेंमीने उघडले
कोरा: पाच दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने समुद्रपूर तालुक्यातील लाल नाला प्रकल्प पुर्णत: भरला आहे. त्यामुळे मंगळवारी दुपारी १२ वाजता या प्रकल्पाचे ५ दरवाजे २५ सेमीने उघडले असून त्यातून ७४.१८ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गुरुवारी सायंकाळपासून सुरु झालेल्या संततधार पावसाच्या पाण्याने हा प्रकल्प आता शंभर टक्के भरला आहे. मागील वर्षी हा प्रकल्प २२ सप्टेंबरला १०० टक्के भरला होता.
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल दीड महिन्यापूर्वीच हा प्रकल्प फुल्ल झाला आहे. या प्रकल्पाचे सध्या पाच दरवाजे उघडले असून यातील पाणी चंद्रपूर जिल्ह्यातील खांबाळा नदीत सोडले जाते. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत असल्याने पूर बघण्याकरिता नागरिकांची गर्दी होत आहे. येथील पुरामुळे चिखली, आसोला व डोंगरगाव यासह इतरही गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि प्रलक्प अधिकारीही यावर लक्ष देऊन आहे. पावसाची संततधार आणि पाणी पातळी लक्षात घेता आणखी दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पाणी सोडताना कार्यकारी अभियंता एस.बी.काळे, उपअभियंता सुहास साळवे, सहाय्यक अभियंता शशांक वर्मा यांच्यासह १० कर्मचारी उपस्थित होते.
नांद प्रकल्पाच्या सात दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग
हिंगणघाट: सततच्या मुसळधार पावसामुळे वणा नदीवरील नांद धरण आज दुपारी २ वाजता ७१.६४ टक्के भरले. त्यामुळे या प्रकल्पातून ६८३.५२ क्युबिक मीटर प्रतीसेकंद पाण्याचा प्रवाह असल्याने सुरुवातीला या प्रकल्पाचे ४ दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर सायकाळपर्यंत सात दरवाजे दोन मीटर पर्यंत उघडले असून यातून ११२२.३५ सेमी.प्रती सेकंद पावसाचा विसर्ग सुरु आहे. तालुक्यात मागील दोन दिवसांपासुन सुरु असलेल्या सततच्या पावसाने शेतकरी वर्ग सुखावला असुन जमिनीतील पाण्याची पातळी वाढली आहे. पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून चांगलीच उघडीप दिल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. खरिपातील कपाशी व सोयाबीन पीक हातुन जाण्याच्या मार्गावर होते. परंतु या पावसाने सध्यातरी शेतकऱ्यांना जीवनदान दिल्याचे दिसून येते.
चिंतातूर शेतकऱ्यांची चिंता दूर
घोराड - परिसरात मागील तीन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. या पावसाने शेतकऱ्यांची सध्यातरी चिंता मिटल्याचे बोलले जात आहे. रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेले आणि आद्रा नक्षत्राच्या शेवटच्या चरणात आलेल्या सरींनी खरीप हंगामात पेरणीची सुरुवात झाली. पण, त्यानंतर पावसाने चांगलीच दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला होता. पण, आता आषाढ सरी शेतकºयांची पिक वाचविण्यासाठी चाललेली धडपड थांबविण्यास पोषक ठरल्या आहे. बुधवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत असल्याने सध्याच्या पाऊस हा पिकांची खुंटलेली वाढ करण्यास उपयुक्त ठरणार आहे.
हा पाऊस कपाशी व सोयाबीन पिकाला पोषक ठरणारा आहे. या पावसामुळे विहिरीच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. कोरडवाहू शेतकºयांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला असून हा पाऊस थांबताच शेतकरी खत, फवारणीच्या तयारी करीत आहे. हा पाऊस असाच सुरु राहिल्यास शेतकºयांच्या निंदनाच्या खर्चात मात्र वाढ होण्याची शक्यता आहे.