पाणपोईचा धर्म झाला बाटलीबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 11:34 PM2019-06-01T23:34:36+5:302019-06-01T23:35:11+5:30
तहानलेल्यांची तृष्णा भागविण्यासारखा दुसरा कोणता माणुसकीचा मोठा धर्म नाही. त्यामुळेच उन्हाळा आला की शहरासह ग्रामीण भागात सामाजिक भान म्हणून पाणपोई उभारल्या जातात. परंतु काही वर्षापासून पाणी टंचाई व पाणी विक्रीच्या व्यापारामुळे सामाजिक बांधीलकी जोपासणाºया पाणपोईचा धर्म बाटली बंद पाण्यामध्ये कालबाह्य झाल्याचे चित्र आहे.
दिलीप चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : तहानलेल्यांची तृष्णा भागविण्यासारखा दुसरा कोणता माणुसकीचा मोठा धर्म नाही. त्यामुळेच उन्हाळा आला की शहरासह ग्रामीण भागात सामाजिक भान म्हणून पाणपोई उभारल्या जातात. परंतु काही वर्षापासून पाणी टंचाई व पाणी विक्रीच्या व्यापारामुळे सामाजिक बांधीलकी जोपासणाºया पाणपोईचा धर्म बाटली बंद पाण्यामध्ये कालबाह्य झाल्याचे चित्र आहे.
तहानलेल्यास घोटभर पाणी पाजणे ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाºया सामाजिक संस्था व संघटना सामाजिक भान जपत दरवर्षी उन्हाळ्यात वाटसरुंसाठी पाणपोई सुरू करीत होते.
या सामाजिक कार्यासाठी पाच-सहा वर्षापूर्वी बरेच हात पुढे येत. मात्र आजघडीला या सामाजिक कार्यासाठी अनेकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. सेवाभाव या वृत्तीने ग्रामीण भागात बसस्थानकासह वर्दळीच्या ठिकाणी किंवा आपल्या घर व दुकानासमोर पाणपोई उभारतात.
या ठिकाणी रस्त्यावरुन जाणारी व्यक्ती आपसुकच पाणपोई दिसली की, क्षणभर विश्रांती घेऊन दोन घोट पाणी पिऊन नंतर पुढच्या मार्गाने प्रवासाला जायचे. काही वर्षापूर्वी ग्रामीण भागात हे चित्र बहुतांश ठिकाणी दिसायचे. परंतु कालौघात ग्रामीण व शहरी भागात पाणी पाजणे या पुण्याच्या कामाला अखेरची घरघर लागली आहे.
गोरेगावात प्याऊचे उद्घाटन
निसर्ग मंडळाने नागरिकांसाठी मुख्य चौकाच्या बाजूला प्याऊची व्यवस्था केली आहे. मंगळवारी (दि.२८) या प्याऊचे उद्घाटन करून नागरिकांसाठी प्याऊ सुरू करण्यात आले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष रेखलाल टेंभरे, सचिव रेवेंद्रकुमार बिसेन, उपाध्यक्ष गुड्डू कटरे, कोषाध्यक्ष अंकीत रहांगडाले, महेश कटरे, डॉ. लोकेश तुरकर, टिटू जैन, शेखर रहांगडाले, पुरुषोत्तम बोपचे, गुड्डू ठाकूर, जगदिश पटले, किशोर भगत, सुरेश कटरे, रंजीत हरिणखेडे उपस्थित होते.
लहान मोठ्या कार्यातही विकतचे पाणी
तहानलेल्यांची तहान भागविणे हे पुण्याचे काम समजले जाते व पाणी विकणे हा अपराध समजला जायचा. परंतु काळ बदलला, आता ग्रामीण भागासह शहरी भागापर्यंत पाणी विकण्याच्या व्यवसायाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाटर फिल्टर उभे राहिले. कॅनच्या पाण्याची अलीकडे फॅशन झाली, अनेक ठिकाणी लहानमोठ्या कार्यातही कॅनचा वापर केला जात आहे.
हॉटेलच्या पाण्यावर भिस्त
आजघडीला पानपोईचे पाणी पिने नागरिकांना कमीपणाचे वाटत आहे. त्यामुळे अनेक जन हॉटेलमध्ये जाऊन काहीतरी खात हॉटेलच्या पाण्यावर तहान भागवितात. एकीकडे हॉटेलातील गरम पाण्याने तहान भागत नाही तर दुसरीकडे बाटलीबंद पाण्याशिवाय उपाय नाही.