कालव्याच्या दुरूस्तीशिवाय पाणी आणण्याची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 10:25 PM2019-04-14T22:25:42+5:302019-04-14T22:25:54+5:30

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डांगोर्ली येथील वैनगंगा नदीच्या पात्रात केवळ ७ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरवासीयांना तीव्र पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पुजारीटोला धरणाचे पाणी आणण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ज्या कालव्याव्दारे पाणी आणण्याचे नियोजन केले जात आहे,त्याची अद्यापही दुरूस्ती झाली नसल्याने मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

Watering without water canal repair | कालव्याच्या दुरूस्तीशिवाय पाणी आणण्याची कसरत

कालव्याच्या दुरूस्तीशिवाय पाणी आणण्याची कसरत

Next
ठळक मुद्देआज अधिकारी देणार भेट : शहरवासीयांवर पाणी टंचाईचे संकट

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डांगोर्ली येथील वैनगंगा नदीच्या पात्रात केवळ ७ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरवासीयांना तीव्र पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पुजारीटोला धरणाचे पाणी आणण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ज्या कालव्याव्दारे पाणी आणण्याचे नियोजन केले जात आहे,त्याची अद्यापही दुरूस्ती झाली नसल्याने मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातंर्गत पाणी पुरवठा केला जातो. डांगोर्ली येथील वैनगंगा नदीच्या पात्रात पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत शहरवासीयांना प्रती व्यक्ती १८६ लिटर याप्रमाणे दिवसातून दोन वेळा पाणी पुरवठा केला जातो. मात्र मागील तीन चार वर्षांपासून शहरवासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. यावर मात करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने वैनगंगा नदीच्या पात्रात सिमेंटच्या चुंगड्याचा बंधारा तयार करुन विहिरीची पाणी पातळी वाढविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. तर मागील वर्षी पाणी टंचाईची समस्या गंभीर झाल्याने यावर मात करण्यासाठी गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावरील पुजारीटोला धरणातून कालव्याव्दारे पाणी डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविण्यात आले होते. यंदा देखील तीच वेळ आली असून वैनगंगा नदीचे पात्र एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कोरडे पडल्याने पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीची पातळी खालावली आहे. त्यामुळेच शहरवासीयांना ७ दिवस नियमित पाणी पुरवठा होण्याची शक्यता असून त्यानंतर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येणार आहे.यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि सिंचन विभाग आणि जिल्हा प्रशासनाची यंत्रणा पुजारीटोला धरणातून पाणी आणण्यासाठी उपाय योजना करण्याच्या कामाला लागली आहे.
मात्र ज्या कालव्याव्दारे पाणी आणण्यात येणार आहे. त्याची अद्यापही दुरूस्ती करण्यात आली नाही.
त्यामुळे त्यामुळे पुजारीटोला धरणाचे पाणी डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचणार की नाही यावर शंका उपस्थित केली जात आहे.
मागील वर्षी फुटला होता कालवा
पुजारीटोला धरणातून डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेपंर्यत पाणी पोहचविण्यासाठी सिंचन विभागाच्या कालव्याचा वापर मागील वर्षी करण्यात आला होता. यंदा देखील तोच प्रयोग राबविण्यात येणार आहे. मात्र मागील वर्षी कामठा आणि आमगावजवळ पाणी सोडल्यानंतर कालवा फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाला होता. तर यंदा सुध्दा या कालव्याची दुरुस्ती करण्यात आली नसून पाणी सोडण्याची तयारी केली जात आहे. त्यामुळे पुन्हा समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
धरण आणि कालव्याची पाहणी आज
शहरावरील पाणी टंचाईचे संकट दूर करण्यासाठी पुजारीटोला धरणातून पाणी आणणण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग आणि सिंचन विभागाचे अधिकारी सोमवारी (दि.१५) पुजारीटोला प्रकल्प आणि कालव्याची पाहणी करणार आहेत.
कोट्यवधी रुपयांच्या योजनेनंतरही समस्या
शहरातील पाणी टंचाईच्या समस्येवर कायम स्वरुपी मात करण्यासाठी चार वर्षांपूर्वी १०० कोटी रुपये खर्चून डांगोर्ली येथे पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली होती. मात्र सुरूवातीचे वर्ष वगळता मागील तीन वर्षांपासून शहरवासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची योजना केवळ नाममात्र ठरत आहे.

Web Title: Watering without water canal repair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.