परंपरागत ‘वाजा’ संस्कृती लोप पावण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:01 AM2018-02-22T00:01:53+5:302018-02-22T00:02:21+5:30

‘वाजा’ महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लोकसंगीतातील एक वाद्य.या लोकसंगीताने एकेकाळी गावागावात आपली ओळख निर्माण केली होती.

On the way to end the traditional 'Waza' culture | परंपरागत ‘वाजा’ संस्कृती लोप पावण्याच्या मार्गावर

परंपरागत ‘वाजा’ संस्कृती लोप पावण्याच्या मार्गावर

Next
ठळक मुद्देघोटीत ‘वाजा’ मेळावा : प्रशासनाने लोकसंगीताला नवसंजीवनी देण्याची गरज

दिलीप चव्हाण ।
ऑनलाईन लोकमत
गोरेगाव : ‘वाजा’ महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लोकसंगीतातील एक वाद्य.या लोकसंगीताने एकेकाळी गावागावात आपली ओळख निर्माण केली होती. पण कालांतराने या वाजाची जागा संदल, डीजे, बँड यांनी घेतली. त्यामुळे परंपरागत ‘वाजा’ वाजविणाºया होली, होलीया व होल्या या समाजावर उपासमारीची पाळी आली आहे. या समाजाची कुठलीही संघटना नसल्यामुळे या समाजाला आजही आधार नाही. त्यामुळे होली समाज मागासलेला आहे. नुसता वाजा वाजवून कुटुंबाचे उदरनिर्वाह करणाºया या समाजाला शासनाने मदत करावी अशी अपेक्षा आहे.
गोरेगाव तालुक्यातील घोटी येथे शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी होली समाजाचा ‘वाजा’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विविध प्रकारचे वाद्य या मेळाव्याचे मुख्य आकर्षण होते. पारंपारिक व्यवसायातून या समाजाने बाहेर निघावे तरच या समाजाचे उत्थानाचे दार उघडे होतील असे बोलले जात असले तरी हा समाज आजही कोणत्या जाती, वर्गात मोडतो हे माहित नाही. त्यांना होल्या बोलले गेले व तसेच कागदावर लिहिले गेले, होली वेगळा व त्याच कुटुंबातील होलीया वेगळा, अशी या अल्पसंख्याक समाजाची खरी परिस्थिती आहे.
शंभर वर्षापूर्वी गावागावात दंगल भरायची. गावकरी होली समाजाला वाजा वाजविण्यासाठी बोलवायचे. आता ही प्रथा काळाच्या पडद्याआड झाली आहे. पूर्वी शेतीचे काम संपल्यानंतर वाजा वाजवून शेतीतून परत यायचे. शेतातील थंड वातावरणामुळे वाजा थंड व्हायचा. ते गरम करण्यासाठी तणस जाळायचे. आता ही प्रथा बंद झाली. बँड, संदल, डिजे या वाद्यांनी ही जागा घेतल्याचे चित्र समाजात उभे आहे.
वाजा संस्कृतीत सात प्रकारचे लोकसंगीत आहेत. या लोकसंगीताने एकेकाळी साºया महाराष्टÑात आपली छाप सोडली. परंतु कालपरत्वे लोकसंगीताला प्रशासनाने मदत केली नाही. वाजा लोकसंस्कृतीचा भाग म्हणून बहुजन समाजाने याचा वापर केला. पण या संगिताला जीवंत ठेवण्यासाठी प्रशासनाने कुठलेही ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे वाजा लोकसंगीत लोप पावण्याच्या मार्गावर आहे.
या लोकसंगीताला जीवंत ठेवणारा होली समाज आजही मागासलेले जीवन जगत आहे.
साहित्य उपलब्ध करुन देण्याची गरज
होली समाजाचे लोक पूर्वीच्या काळात शेळीच्या चामडापासून वाजा बनवायचे. या वाजातील बाहेरील आवरण, चिंचाच्या झाडाच्या सालापासून तर ‘वाजा’ वाजविण्यासाठी ‘तारा’ सागवान या झाडापासून तयार करण्यात येते. आज घडीला प्राण्यांचे कातडे मिळणे दिवास्वप्न ठरत आहे. सागवन व चिंचाचे झाडही कमी झाले आहेत. त्यामुळे भविष्यात वाजा संस्कृतीला पूरक वातावरण नाही. त्यामुळे शासनाने वाजाला लागणारे साहित्य उपलब्ध करुन देण्याची गरज आहे.
समाजाला हवे दिशादर्शक मार्गदर्शन
होली, होलीया, होल्या या एकाच जातीच्या समाजाला तीन नावाने ओळखले जाते. २०११ पूर्वी या समाजाला जातीचे दाखले देण्यासाठी मोठी अडचण होती. २०११ नंतर तत्कालीन राज्यमंत्री सचिन अहिर यांनी शासन आदेश काढून होली समाजाला जातीचे दाखले देण्याचे आदेश काढले. जिल्ह्यात या समाजाची दहा हजाराच्या जवळपास लोकसंख्या आहे. महाराष्टÑातील पूर्व विदर्भात या समाजाचे लोक वास्तव्य करतात. शिक्षणात मागासलेला हा समाज परंपरागत वाजा वाजविण्यातच गुंतला आहे. अंत्यसंस्कारासाठी वाजा, वाढदिवसाचा वाजा, लग्नातील वाजा, पºहे संपले तर वाजणारा वाजा, मोहरम सनाला वाजणारा वाजा, वरात वाजा, हळदी वाजा या सात प्रकारात वाजविण्याची कला या होली समाजात रूढ आहे.

होली समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. जिल्हा परिषदेच्या उपलब्ध निधीतून या जातीतील लोकांचे प्रश्न सोडविाण्याचा प्रयत्न करणार.
-विश्वजित डोंगरे
समाजकल्याण सभापती, जि.प.गोंदिया
.............................................
होली समाजाचे एकच वाद्य आहे. प्रसंगावधान राखून वाद्ये वाजविले जाते. कसलेही प्रशिक्षण नसताना या कलेला जीवंत ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा नव्या पिढीला ‘वाजा’ लोकसंगीत कधीही दिसणार नाही.
- दुलीचंद बुद्धे
सचिव अधिकारी/कर्मचारी समन्वय समिती, गोंदिया

Web Title: On the way to end the traditional 'Waza' culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.