जिल्ह्यातील प्रलंबित बांधकामाचा मार्ग हाेणार सुकर ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:30 AM2021-05-26T04:30:06+5:302021-05-26T04:30:06+5:30
गोंदिया : गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या विविध बांधकामांमधील अडथळे दूर करुन या बांधकामाना त्वरित सुरुवात करण्यात यावी ...
गोंदिया : गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या विविध बांधकामांमधील अडथळे दूर करुन या बांधकामाना त्वरित सुरुवात करण्यात यावी यासंदर्भात मंगळवारी (दि.२५) मुंबई मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व खा. प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील उड्डाण पूल, कारागृह बांधकाम आणि रस्ते बांधकामाच्या विषयावर चर्चा या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील प्रलंबित बांधकामाचा मार्ग सुकर होणार आहे.
मुंबई मंत्रालयात मंगळवारी पार पडलेल्या बैठकीला आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ. राजू कारेमोरे, मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्रादेशिक विभाग, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर, अधीक्षक अभियंता राष्ट्रीय महामार्ग मंडळ, प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, गोंदिया सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच या विभागांचे सचिव उपस्थित होते. खा. प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाण पूल पाडून त्या ठिकाणी नवीन उड्डाण पुलाचे बांधकाम करणे, गोंदिया शहरातील टीबी हॉस्पिटल ते गायत्री मंदिरपर्यंतच्या मार्गाचे चौपदरीकरण करणे, कुडवा टी पाईंट ते पांढराबोडी मार्ग कटंगीपर्यंत रस्त्याचे चौपदरीकरण करणे, गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामाच्या वाढीव खर्चाच्या अंदाजपत्रकास शासनाने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे बांधकामाला गती देऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम पूर्ण करणे, गोंदिया येथील शासकीय विश्रामगृहाची इमारत जीर्ण झाली असून तिचे पुर्नबांधकाम करणे, रावणवाडी-कामठी-कालीमाटी-आमगाव या रस्त्याचे डांबरीकरण करणे, तिरोडा-कवलेवाडा ते सिहोरा रस्त्याचे डांबरीकरण करणे, कुडवा- हिवरा- धापेवाडा-परसवाडा रस्त्याचे डांबरीकरण करणे आदी विषयांवर बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या बांधकामातील अडथळे दूर करुन या बांधकामांना गती देण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
...........
कारागृहाच्या बांधकामावर चर्चा
मंगळवारी मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा कारागृहाचा बांधकामाचा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सुध्दा अडचणी दूर करुन बांधकामाला गती देण्यास सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे नूतनीकरण करण्यासंदर्भात सुध्दा यावेळी चर्चा करण्यात आली.
......