जि.प.शाळा बंद होण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 09:53 PM2018-08-26T21:53:55+5:302018-08-26T21:55:24+5:30
सडक अर्जुनी तालुक्यातील ग्रामपंचायत राका अंतर्गत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने वेळीच उपाय योजना करण्याची गरज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरी : सडक अर्जुनी तालुक्यातील ग्रामपंचायत राका अंतर्गत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने वेळीच उपाय योजना करण्याची गरज आहे.
प्राप्त माहितीनुसार राका ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवी वर्ग भरत असून एकूण १५२ शिक्षण घेत आहेत. इयत्ता पाचवीमध्ये केवळ १९ विद्यार्थी आहे. गावातील विद्यार्थी खासगी शाळांमध्ये जात असल्याने जिल्हा परिषदेची शाळा ओस पडत असल्याचे चित्र आहे. दरम्यान गावातच खासगी शाळा सुरू झाली असून या शाळेकडे विद्यार्थ्यांचा कल असल्याची माहिती आहे. जि.प.शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांची पटसंख्या कायम ठेवण्यासाठी धडपड करीत आहेत. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे बोलल्या जाते. जि.प.शाळेची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने ही शाळा बंद तर होणार नाही अशी चर्चा पालक वर्गात आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होवू नये, यासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहे. काही झाले तरी शाळा बंद होणार नाही. मात्र खासगी शाळांकडून विद्यार्थ्यांना आमिष दाखविले जात आहे. त्याला बळी न पडता पालकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेतच पाठवावे.
-निमराज डोंगरवार,
मुख्याध्यापक
जि.प.शाळा रॉका