आम्ही आहोत सारख्याच चेहऱ्यांचे, ७५१७ मतदारांची नोंद; विशेष पुनरिक्षण कार्यक्रम, अपडेट करण्यासाठी प्रक्रिया सुरू
By कपिल केकत | Published: December 30, 2023 06:23 PM2023-12-30T18:23:18+5:302023-12-30T18:24:03+5:30
एकाच चेहऱ्याच्या या जगात सात व्यक्ती असतात, असे कित्येकांकडून सांगितले जाते.
गोंदिया: एकाच चेहऱ्याच्या या जगात सात व्यक्ती असतात, असे कित्येकांकडून सांगितले जाते. त्याची अनुभूती जिल्ह्यातही येत आहे. मात्र, या व्यक्ती सारख्याच चेहऱ्याच्या नसून मिळता-जुळता चेहरा असलेल्या असून, मतदार यादी विशेष पुनरिक्षक कार्यक्रमातून ते उघडकीस आले आहे. जिल्ह्यात अशा ७५१७ मतदारांची नोंद घेण्यात आली असून, त्यांची माहिती अपडेट व छायाचित्र अपडेट करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे.
२०२४ म्हणजे निवडणुकांचे वर्ष ठरणार आहे. याची सुरुवात लोकसभा निवडणुकीपासून होणार असून, त्यानंतर विधानसभा या दोन मोठ्या निवडणुका होणार आहेत. याशिवाय, नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायत आदिंच्या निवडणुकासुद्धा २०२४ मध्येच होतील, अशी शक्यता दिसून येत आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून, निवडणूक आयोगाकडून मतदार यादी विशेष पुरनरिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील मतदारांची नाव नोंदणी, नाव कमी करणे, फोटो अपडेट आदी कामे केली जात आहेत. विशेष म्हणजे, मतदार यादीशी संबंधित ही कामे केली जात असतानाच जिल्ह्यात ७५१७ मतदार सारख्याच चेहऱ्याचे (फोटो सिमिलर एंट्री) असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये फोटे जुनाट झाल्याने किंवा थोडीफार साम्यता असल्याने हा प्रकार घडतो.
गोंदिया विधानसभा क्षेत्रात ४३६६ मतदार
गोंदिया जिल्ह्यात चार विधानसभा क्षेत्र असून, मतदार यादीचा कार्यक्रम निवडणूक विभागाकडून विधानसभा क्षेत्रनिहाय राबविला जातो. यामध्ये बघितले असता गोंदिया विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ४३६६ मतदार सारख्याच चेहऱ्याचे असल्याची नोंद घेण्यात आली आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर तिरोडा विधानसभा क्षेत्र असून, तेथे १५२६ मतदार सारख्याच चेहऱ्याचे आढळून आले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर आमगाव विधानसभा क्षेत्र असून, तेथे ८४८, तर शेवटी अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्र असून, तेथे ७७७ मतदार सारख्याच चेहऱ्याचे आढळून आले आहेत.
बीएलओंमार्फत तपासणी सुरू
सारख्याच चेहऱ्यांच्या या ७६१७ मतदारांचा हा प्रश्न सोडविण्यासाठी बीएलओंकडून तपासणी सुरू आहे. बीएलओ या संबंधित मतदारांकडून त्यांचे छायाचित्र घेऊन त्यांना अपडेट करण्याचे कार्य करीत आहेत. यानंतर या मतदारांना घेऊन निर्माण होणारा सारख्या चेहऱ्यांचा हा घोळ संपुष्टात येणार आहे. मात्र, यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे.
सारख्याच चेहऱ्यांच्या मतदारांचा विधानसभानिहाय तक्ता
विधानसभा क्षेत्र - मतदार
अर्जुनी-मोरगाव (६३)- ७७७
तिरोडा (६४)- १५२६
गोंदिया (६५)- ४३६६
आमगाव (६६)- ८४८
एकूण- ७५१७