परिवर्तनाची आशा घेऊन आलोय

By admin | Published: April 22, 2016 03:41 AM2016-04-22T03:41:07+5:302016-04-22T03:41:07+5:30

जिल्ह्यात पाऊस प्रचंड पडतो. माती चांगली आहे. पाण्याचा साठा भरपूर आहे. वनसंपत्ती आपण जपून ठेवली आहे. या

We have come forward with the hope of innovation | परिवर्तनाची आशा घेऊन आलोय

परिवर्तनाची आशा घेऊन आलोय

Next

गोंदिया : जिल्ह्यात पाऊस प्रचंड पडतो. माती चांगली आहे. पाण्याचा साठा भरपूर आहे. वनसंपत्ती आपण जपून ठेवली आहे. या वनसंपत्तीचे जतन करून गावातील युवकांना रोजगार निर्माण करायचा आहे. रोजगार आणि वनसंपत्तीचा संगम साधून पुढच्या दहा वर्षांचे नियोजन करायचे आहे. गावाला सुजलाम-सुफलाम करण्याची आशा घेवून आलोय, अशी भावनिक साद घालून वनग्रामसाठी गावातील लोकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त ‘ग्राम उदय ते भारत उदय’ उपक्रमांतर्गत देवरी तालुक्यातील नक्षलग्रस्त दुर्गम आदिवासीबहुल फुक्कीमेटा ग्रामपंचायतीला संत तुकाराम वनग्राम करण्यासाठी तथा ग्रामसभेला वनहक्काची जाणीव करण्यासाठी फुक्कीमेटा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत बुधवारी (दि.२०) सायंकाळी सात वाजता कृतीयुक्त ग्रामसभा घेण्यात आली. त्यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधताना अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
ग्रामसभेचे उद्घाटन आ. संजय पुराम यांनी केले. फुक्कीमेटा ग्रामपंचायतीचे सरपंच गजरू नेताम, जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम, सहायक वनसंरक्षक बिसेन, देवरीचे गटविकास अधिकारी एस.एन. मेश्राम, उपसरपंच भागचंद मोहबे, सामूहिक वन हक्क समितीच्या अध्यक्ष शारदा उईके, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष जीवनलाल तावाडे, तंटामुक्त गाव समितीचे निमंत्रक चंद्रकुमार हुकरे, माजी पंचायत समिती सदस्य मुक्ता शहारे मंचावर उपस्थित होते.
विदर्भात वनसंपत्ती जपून ठेवल्याबद्दल आनंद व्यक्त करून मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे यांनी दुष्काळी भागातील विदारक परिस्थितीचे विवेचन केले. दुष्काळी जिल्ह्यात वनसंपत्ती राहिली नाही. त्याचे राज्यावर, संपूर्ण देशावर परिणाम होवू लागले. पर्यावरण व्यवस्था डळमळीत झाली. शेतीचे तंत्र बिघडले. ग्लोबल वार्मिंला आपण पुढे जातोय. जंगलतोडीमुळे ही वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती बदलावी, जंगलाचे संवर्धव व्हावे, तथा शासनाच्या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचाव्यात, सर्व गावकऱ्यांशी संवाद साधता यावे, यासाठीच रात्रीची ग्रामसभा आयोजित केली असल्याचेसुध्दा ते या वेळी म्हणाले.
आ. संजय पुराम यांनी वनांचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले, जंगलाची रक्षा कुणी केली असेल, तर या माझ्या आदिवासी बांधवानी केली. खेड्यात राहतो तोच जंगल वाचवतोे. जंगल वाचला तर माणूस वाचेल. शिवाय वनग्रामातून गावातच रोजगार निर्माण होईल. मोह, डिंक, लाख, आग्याचे तेल, हिरडा, बेहडा हे वनातून मिळणारे वनौपज सरकार घेईल. जंगलावर गावाची मालकी राहील. गावातच रोजगार निर्माण झाल्याने संगळ्यांनाच त्याचा फायदा होईल. गावात कुऱ्हाडबंदी झाली तर इंधनाचा विचार करू नका. सगळ्यांना गॅस सिलेंडर मिळेल, असे सांगून पालकमंत्री पांदन रस्ता योजनेला शासनाने मंजुरी दिली असून लवकरच शेतापर्यंत रस्ता तयार होणार असल्याचेसुध्दा आ. संजय पुराम यांनी याप्रसंगी सांगितले.
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ या संत तुकारामाच्या अभंगाचा उल्लेख करून जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम यांनी पाण्याचे महत्व विशद केले. पाणी किती गरजेचे आहे, हे उन्हाळ्यात कळते. लातूर येथील भिषण पाणी टंचाईवर भाष्य करून वनांचे नियोजन नसल्याने पाणी टंचाई निर्माण होत असल्याचे ते याप्रसंगी म्हणाले. गडचिरोली जिल्ह्यातील लेखामेंढा या गावाला वनहक्क मिळाल्याने गावाचा विकास कसा झाला याची माहितीसुध्दा राजकुमार पुराम यांनी दिली. वनांच्या संरक्षणासह वनक्षेत्र वाढविण्यासाठी ग्रामसभेत नियोजन करण्याचे आवाहनसुध्दा त्यांनी केले.
प्रास्ताविक ग्रामसेवक आर.बी. बोरसरे व संचालन यु.आर. टेंभरे यांनी केले. आभार झोडे यांनी मानले. कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे कर्मचारी तथा गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

तर मधूमेह दूर होतो
४बिजाच्या वृक्षाचा वापर करून गडचिरोली येथे ग्लास तयार केले जातात. या ग्रासमधील पाणी प्यायल्याने मधूमेहासारखा आजार दूर होतो. वनग्रामातून तयार केलेले हे ग्लास सध्या सालेकसा तालुक्यातील हाजराफाल येथे विक्रीस उपलब्ध आहेत. त्यातून युवकांना मोठा रोजगार मिळाला. अशा विविध उपक्रमांची सहायक वनसंरक्षक बिसेन यांनी माहिती देवून वनग्रामबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

Web Title: We have come forward with the hope of innovation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.