आम्ही कारवाई केली, आता तुम्हीही करून दाखवा
By admin | Published: April 12, 2016 04:13 AM2016-04-12T04:13:37+5:302016-04-12T04:13:37+5:30
राजकारणात आम्ही गुंडागिरीचे समर्थन करीत नाही. त्याकरिताच आम्ही शिव शर्मावर कारवाई करून त्यांना पक्षातून
गोंदिया : राजकारणात आम्ही गुंडागिरीचे समर्थन करीत नाही. त्याकरिताच आम्ही शिव शर्मावर कारवाई करून त्यांना पक्षातून निलंबित केले. मात्र कांग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस भ्रष्टाचार व गुंडागिरीच्या विरोधात आहे तर आता त्यांनीही आपल्या सदस्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा खासदार नाना पटोले यांनी केली.
येथील शासकीय विश्रामृहात सोमवारी (दि.११) आयोजित पत्रपरिषदेत आमदार अग्रवाल यांच्यावरील हल्ला प्रकरणात पक्षाची बाजू मांडताना ते बोलत होते. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी अध्यक्ष विनोद अग्रवाल, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, भाऊराव उके, गुड्डू कारडा व अन्य उपस्थित होते. पुढे बोलताना खा.पटोले यांनी आमचे सदस्य गुंडागिरी करणारे आहेत तर त्यांनी आपल्या सदस्यांना बघावे. त्यांना त्यांचे किती सदस्य गुन्हेगार आहेत याची माहिती नसल्यास आम्ही यादी जाहीर करतो, असा टोला लगावला.
नगर परिषदेतील भ्रष्टाचारावर बोलताना पटोले यांनी, १५ वर्षे सत्तेत असताना अवघ्या राज्याचे बजेटच गोंदिया नगर परिषदेत येत होते. तो पैसा गेला कुठे याचा शोध मी घेत आहे. मात्र तो पैसा काही दिसत नाही, असा टोला लावला. आम्ही तर आज सत्तेत आलो, १५ वर्षे त्यांचे राज्य होते. याची मुख्यमंत्र्यांकडून चौकशी करण्याची मागणी करू, ते म्हणाले. शहर बंद करून तोडफोड करून दहशत पसरविली जात आहे. अशात आम्ही व्यवसायिकांच्या सोबत असल्याचेही ते म्हणाले. शिव शर्मा यांनी केलेल्य कृत्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत नाही. मात्र त्यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याला घेऊन पोलीस अधीक्षकांसोबत बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेतील युतीवर
३० दिवसात निर्णय घेणार?
४आपल्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या या पत्रपरिषदेत पत्रकारांच्या एका प्रश्नाने खा.पटोले व भाजप पदाधिकाऱ्यांची गोची झाली. दोन्ही पक्षांत एवढे भेद असताना जिल्हा परिषदेत एकत्र का? हा प्रश्न केला असता त्यावर उत्तर देताना पटोले स्पष्टपणे बोलू शकले नाही. मात्र ३० दिवसांत त्यावरही निर्णय घेणार, असे ते म्हणाले. त्यामुळे जिल्हा परिषदेतील काँग्रेस-भाजपचा घरोबा किती दिवस राहणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.