मराठीला आपण किती न्याय देतो हे तपासणे गरजेचे आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:33 AM2021-03-01T04:33:06+5:302021-03-01T04:33:06+5:30
अर्जुनी मोरगाव : मराठी भाषेला १५०० वर्षांची परंपरा लाभली आहे. जगभरातल्या मोठ्या भाषिकांच्या बोलणाऱ्यांचा समूह आहे. नऊ कोटी माणसांची ...
अर्जुनी मोरगाव : मराठी भाषेला १५०० वर्षांची परंपरा लाभली आहे. जगभरातल्या मोठ्या भाषिकांच्या बोलणाऱ्यांचा समूह आहे. नऊ कोटी माणसांची मातृभाषा मराठी आहे. मराठी ही आपली आई आहे. प्रत्येकाने बोलताना मराठीचा वापर केला पाहिजे. आज इंग्रजी भाषेचा प्रभाव आहे, त्यामुळे आजची पिढी मराठी बोलताना अडखळते. कॉन्व्हेंट संस्कृती आल्याने मुलांना रंगांची नावे मराठी सांगता येत नाही, त्यामुळे मराठीला आपण किती न्याय देतो, हे तपासणे गरजेचे आहे, असे सांगत एकदा तरी आयुष्यात कोणीतरी भेटावे, आनंद त्यांचा व हसू माझे असावे, अशी ही कविता प्राचार्य अनिल मंत्री यांनी सादर केली.
स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच जी.एम.बी. कनिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी जी.एम.बी. कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य वीणा नानोटी, पर्यवेक्षिका छाया घाटे, जुगलकिशोर राठी, मुकेश शेंडे उपस्थित होते. देवी सरस्वती, गुरुमाऊली श्री संत ज्ञानेश्वर, ज्ञानपीठकार विष्णू वामन शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांच्या छायाचित्रांचे पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. भावना व्यक्त करण्याचे उत्तम साधन भाषा असते. कुसुमाग्रजांच्या कवितेतून प्रखर देशभक्तीचा प्रत्यय येतो. आजच्या पिढीने मम्मी-पप्पाऐवजी आई-बाबा म्हणावे, त्यात जिव्हाळा असतो, असे प्रतिपादन प्राचार्य वीणा नानोटी यांनी केले. मराठी भाषेचा उगम, दशा व दिशा तसेच मराठी भाषेचा इतिहास व महत्त्व मराठी विभागप्रमुख संजय बंगळे यांनी सांगितले. यावेळी छाया घाटे, जुगलकिशोर राठी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कॉन्व्हेंटच्या शिक्षिका अश्विनी भावे यांनी जनाबाईंच्या ओव्यांचे सुंदर गायन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन मराठी विभाग उपप्रमुख प्रा. इंद्रनील काशिवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सांस्कृतिक प्रमुख कुंडलिक लोथे, अर्चना गुरनुले, माधुरी पिलारे, भाग्यश्री सिडाम, होमराज गजबे, शशिकांत लोणारे, महेश पालीवाल, रूपाराम धकाते, विष्णू चाचेरे, ज्ञानेश्वर रोकडे, अविनाश मेश्राम, संजय मोरे, प्रा. नंदा लाडसे यांनी सहकार्य केले.
......
विविध स्पर्धांचे आयोजन
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून विद्यालयात साहित्यिकांच्या माहितीची प्रदर्शनी, पुस्तक प्रदर्शनी, निबंध स्पर्धा, गुजगोष्टी कथा स्पर्धा, मुखपृष्ठ रेखाटन स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते.