वर्षभरात जिल्हा हागणदारीमुक्त करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2016 02:12 AM2016-01-16T02:12:33+5:302016-01-16T02:12:33+5:30
अस्वच्छता व सार्वजनिक ठिकाणी शौचास बसण्यामुळे अनेक आजार पसरतात. रोगराईवर मात करण्यासाठी...
जि.प. अध्यक्षांचा संकल्प : स्वच्छ भारत अभियान आढावा सभा
गोंदिया : अस्वच्छता व सार्वजनिक ठिकाणी शौचास बसण्यामुळे अनेक आजार पसरतात. रोगराईवर मात करण्यासाठी आणि स्वच्छता निर्माण करण्यासाठी येत्या एक वर्षात जिल्हा हागणदारीमुक्त करू, असा संकल्प जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बुधवारी (दि.१४) स्वच्छ भारत अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या सभेत त्या बोलत होत्या.
याप्रसंगी आ. विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, राज्याचे स्वच्छतादूत भारत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, पोलीस उपअधीक्षक (गृह) सुरेश भवर प्रामुख्याने उपस्थित होते.
मेंढे पुढे म्हणाल्या, जिल्ह्यात शौचालयासाठी शासनाचे अनुदान मिळते. प्रत्येक घरी शौचालय उभे झाले पाहिजे, यासाठी आज लोकसहभागाची आवश्यकता आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना शौचालय बांधून दिले जातात. निर्मलग्राम योजना असताना अनेक गावे स्वच्छ झाली, तेथे शौचालयांची निर्मिती झाली. परंतु आता अनेक गावांत स्वच्छतेचा अभाव आहे. शौचालये वापरण्यास योग्य नाहीत. तेव्हा आता त्या लाभार्थ्यांनासुद्धा शौचालय योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
लोकप्रतिनिधींनीसुद्धा गावे स्वच्छ व हागणदारीमुक्त करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगून मेंढे म्हणाल्या, शासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीसुद्धा या अभियानात मनापासून सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले.
आ. रहांगडाले म्हणाले, ज्या घरी शौचालय नाही, त्या कुटुंब प्रमुखाने स्वच्छतेचा संकल्प करून शौचालय बांधावे. स्वच्छतेमुळे समृद्धी येण्यास मदत होते. प्रत्येकाने संकल्प केला तर जिल्हा स्वच्छतेतून समृद्धीकडे निश्चित जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले, स्वच्छतेच्या बाबतीत एक नवचैतन्य निर्माण करण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण आहे. २४ जानेवारीला संपूर्ण जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानाच्या यशस्वितेत लोकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. ग्रामीण भागात स्वच्छतेबाबत वातावरण निर्मिती आहे. मात्र शहरी भागात वातावरण निर्मिती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
वार्ड स्वच्छतेसाठी स्वाक्षरी मोहीम राबविणार असल्याचे सांगून डॉ. सूर्यवंशी म्हणाले, स्वयंसेवकांच्या माध्यमातून स्वाक्षरी मोहीम राबवून माझा वार्ड स्वच्छ करण्यास तयार असल्याचे लिहून घेण्यात येईल. प्लास्टिक कचरा नष्ट होत नसल्यामुळे तो एकत्र करावा. तालुका पातळीवर गटविकास अधिकाऱ्याने सरपंच व सचिवांच्या सभा घेवून ‘माझे गाव-माझा जिल्हा हागणदारीमुक्त करू’ याचा संकल्प करून त्याबाबत नियोजन करावे, असेही ते म्हणाले.
पाटील म्हणाले, स्वच्छता अभियानात कामाचे हात वाढविणे आवश्यक आहे. युवक, महिला, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, शासकीय यंत्रणा यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. तसेच प्रसार माध्यमांची भूमिकासुद्धा स्वच्छ भारत अभियानात महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
सभेला विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी, त्यांचे प्रतिनिधी, देवरी, सडक-अर्जुनी, अर्जुनी-मोरगाव व गोरेगाव येथील नगर पंचायतचे अध्यक्ष तसेच सेवाभावी संस्थेचे पुरूषोत्तम मोदी, धर्मिष्ठा सेंगर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. आभार लोणकर यांनी मानले. (प्रतिनिधी)