आदिवासीबहुल दुर्गम क्षेत्राच्या विकासकामांना गती देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:26 AM2021-03-14T04:26:26+5:302021-03-14T04:26:26+5:30
सालेकसा : जिल्ह्यातील सालेकसा, देवरी व अर्जुनी-मोरगाव हे आदिवासीबहुल तालुके असून त्यात सालेकसा तालुक्यातील धनेगाव व दरेकसा यासह अनेक ...
सालेकसा : जिल्ह्यातील सालेकसा, देवरी व अर्जुनी-मोरगाव हे आदिवासीबहुल तालुके असून त्यात सालेकसा तालुक्यातील धनेगाव व दरेकसा यासह अनेक क्षेत्र दुर्गम भागात मोडतात. या क्षेत्राच्या प्रतिनिधित्वासाठी रिंगणात होतो, तेव्हा आपण भरभरून प्रेम दिले होते. तेव्हाच या क्षेत्राच्या विकासाचा पायंडा पाडण्यात आला. ९० च्या दशकात खासदार शरद पवार यांनी आपल्या माध्यमातून या क्षेत्राला भेट दिली होती. तेव्हा अनेक विकासकामे सुरू करण्यात आली. मध्यंतरीच्या काळात विकासकामे रखडली, हे मान्य आहे. मात्र, येत्या काळात दुर्गम क्षेत्राच्या विकासकामांना निश्चित गती देऊ, अशी ग्वाही खासदार प्रफुल पटेल यांनी दिली.
धनेगाव येथे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित जनसंवाद व पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
पुढे बोलताना खा. पटेल यांनी, ९० च्या दशकात स्थानिक नागरिक व युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी आपल्या पक्षाच्या तत्कालीन सरकारने विशेष कृती कार्यक्रम राबविले होते. या माध्यमातून शिक्षण, पोलीस, आरोग्य यासारख्या विविध विभागांत चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून जिल्ह्यातील युवकांना प्राधान्य देऊन नोकरीत सामावून घेण्यात आले. आदिवासी क्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून त्याकाळात राज्य सरकारच्या एकूण नऊ टक्के निधी राज्य सरकारच्या अर्थकारणात सुरक्षित करण्यात आला, ते आजही कायम आहे.
बेवारटोला प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर यावे, या अनुषंगाने सिंचनमंत्री जयंत पाटील यांनी तालुक्याच्या कामानिमित्त आढावा घेतला. या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याकरिता निश्चित निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय, आदिवासीबहुल अतिदुर्गम क्षेत्राच्या विकासकामाला गती देऊ, असेही आश्वासन त्यांनी दिले.
याप्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन, माजी खासदार खुशाल बोपचे, नरेश माहेश्वरी, विजय शिवणकर, दुर्गा तिराले, गोपाल तिराले, प्रभाकर दोनोडे, कैलाश धामडे, बिसराम चर्जे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.