निर्बंंधांना धुडकावून लग्नसोहळे थाटामाटात सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 11:09 PM2021-03-01T23:09:40+5:302021-03-01T23:10:17+5:30
राज्यातील कोरोनाची भयावह स्थिती बघता राज्य शासनाने लग्नसोहळ्यांवर पुन्हा एकदा निर्बंध घातले आहेत. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले जिल्ह्यातही लग्नसोहळ्यांवर निर्बंध लावले आहेत. यामध्ये दोन्ही पक्षांकडून ५० पेक्षा जास्त व्यक्ती सहभागी होता येणार नाहीत, असे आदेश काढण्यात आले आहेत. मात्र शहरात या विपरीत परिस्थिती दिसून येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्यासोबतच आता जिल्ह्यातही कोरोना संसर्ग वाढत चालला आहे. याकडे लक्ष देत राज्यासह आता जिल्ह्यातही लग्नसोहळ्यांवर काही निर्बंध लावण्यात आले आहेत. ५० व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्ती असल्यास कारवाईचे आदेश काढण्यात आले आहेत. मात्र शहरात या निर्बंधांना धुडकावून लग्नसोहळे थाटामाटात आटोपले जात असल्याचे दिसून येत आहे. लग्नांमध्ये ना गर्दीवर नियंत्रण, ना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन दिसून येत आहे. कोरोनाची भीती न बाळगता लग्नसोहळ्यांचा धडाका सुरूच आहे.
मध्यंतरी अवघ्या राज्यातच कोरोना नियंत्रणात आला होता. मात्र आता मागील दिवसांपासून कोरोनाचा भडका उडू लागला आहे.
अवघ्या राज्यातच कोरोना पुन्हा डोके वर काढत असून जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली असल्याने खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
राज्यातील कोरोनाची भयावह स्थिती बघता राज्य शासनाने लग्नसोहळ्यांवर पुन्हा एकदा निर्बंध घातले आहेत. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले जिल्ह्यातही लग्नसोहळ्यांवर निर्बंध लावले आहेत. यामध्ये दोन्ही पक्षांकडून ५० पेक्षा जास्त व्यक्ती सहभागी होता येणार नाहीत, असे आदेश काढण्यात आले आहेत. मात्र शहरात या विपरीत परिस्थिती दिसून येत आहेत.
कोरोना भडका पुन्हा एकदा उठला असतानाही शहरात सध्या धडाक्यात लग्नसोहळे आटोपले जात आहेत. त्यातही कोरोनामुळे लावण्यात आलेल्या निर्बंधांना धुडकावून शेकडो-हजारो नागरिकांच्या उपस्थितीत लग्न थाटामाटात उरकले जात आहेत. राज्य शासनाने ५० व्यक्तींच्या उपस्थितीची अट घातली असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मात्र हा प्रकार धोकादायक असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वि
शेष म्हणजे, नागरिकही तेवढ्याच निर्भयपणे अशा या लग्न सोहळ्यांमध्ये उपस्थिती लावून आपले संबंध जोपासताना दिसत आहेत.
आता आहे कारवायांची गरज
मध्यंतरी २-४ वर आलेली दररोजच्या कोरोनाबाधितांची संख्या आता मागील काही दिवसांपासून २० पार झाली आहे. म्हणजेच, जिल्ह्यातही कोरोना पुन्हा आपले डोके वर काढताना दिसत आहे. अशात जिल्हाधिकाऱ्यांनी लग्नसोहळ्यांवर निर्बंध लावतानाच आयोजक तसेच सभागृह व लॉन संचालकांवर प्रत्येकी १० हजार रुपये दंड आकारून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्यानंतरही काहीच कारवाई होत नसल्याने लग्न सोहळे धडाक्यात न घाबरता सुरूच आहेत. हा प्रकार नक्कीच धोकादायक असल्याने यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कारवाई करण्याची गरज असल्याचेही आता नागरिक खुद्द बोलत आहे.