तणसाची आग शेजारच्या शेतात; दोन एकरातील उसाची राख; एकावर गुन्हा दाखल
By नरेश रहिले | Published: December 3, 2023 04:27 PM2023-12-03T16:27:53+5:302023-12-03T16:28:24+5:30
तीन लाखांचे नुकसान
नरेश रहिले, गोंदिया: शेतातील तणसाला आग लावल्याने ती आग पसरत शेजारच्या उसाच्या शेतात गेली. यात उसाच्या वाडीने पेट घेतल्याने चक्क सव्वादोन एकरातील ऊस जळाला. ही घटना २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता घडली.
डुगीपार पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम घाटबोरी-कोहळी येथील संजय केवळराम गहाणे (३८, रा. पंचवटी) याने आपल्या शेतातील तणसाला आग लावली. ती आग जवळील उसाच्या शेतापर्यंत पसरत गेली.
परिणामी या आगीत दोन शेतकऱ्यांच्या शेतातील सव्वा दोन एकरातील ऊस जळाला. छगन पतिराम बारबुद्धे (५२) यांच्या शेतातील दीड एकरातील ऊस किंमत दोन लाख, तर पाच हजार रुपये किमतीचे पीव्हीसी पाइप. तसेच, शेजारच्या लीला हरिचंद बारबुद्धे यांचा पाऊण एकरातील ऊस किंमत ९५ हजार रुपये जळून राख झाला. अशाप्रकारे एकूण तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. या घटनेसंदर्भात डुग्गीपार पोलिसांनी आरोपी संजय गहाणे याच्याविरुद्ध भादंवि कलम ४३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक इलमे करीत आहेत.