घाणीतच भरतो आठवडी बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2017 12:27 AM2017-07-02T00:27:34+5:302017-07-02T00:27:34+5:30

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. येथील बाजार घाणीतच भरतो.

Weekly market is full of dirt | घाणीतच भरतो आठवडी बाजार

घाणीतच भरतो आठवडी बाजार

Next

मटन मार्केट गावाबाहेर हलवा : बाजार समितीमुळे स्वच्छ भारत अभियानाला गालबोट
राजीव फुंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. येथील बाजार घाणीतच भरतो. येथील दुर्गंधीमुळे भारत सरकारचे ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियान सपशेल अपयशी ठरले आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातील आठवडी बाजार प्रसिद्ध आहे. याठिकाणी मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातील व्यापारी, मजूर, शेतकरी, इतर प्रवासी खरेदी-विक्री करिता दर शुक्रवारला ये-जा करतात. तसचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत्यामध्ये धान विक्रीसाठी येथील आवारात धान खरेदी, भाजी बाजार, व्यापार संकुल आदी ठिकाणी ग्राहकांची वर्दळ असते. सदर परिसरात सर्वत्र घाण पसरलेली आहे.
कुजलेल्या भाज्या, प्लास्टिक, डिस्पोजल, पिशव्या, सडक्या वस्तुंचे ढिगारे येथे दिसून येतात. येथील गटारे तुडूंब भरुन आहेत. पावसात तेथील घाण रस्त्यावर येत असून त्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जवळच मुत्रीघराजवळील घाण आजाराला आमंत्रण देते. अनेक महिन्यापासून येथील स्वच्छता करण्यात आली नाही.
येथील परिस्थिती पाहून एका गृहस्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून याठिकाणी स्वच्छ भारत मिशन राबविण्यात यावी, अशी मागणी केली आहे. कृउबास परिसरात स्वच्छता मोहीम कागदावरच केली जात आहे. कृउबासच्या इमारतीत तहसील कार्यालय आहे. याठिकाणी आमदार, खासदार, नेतेमंडळी आणि उपजिल्हाधिकारी असे अनेक नामवंत मंडळी ये-जा करतात. पण शासन व प्रशासनाला येथे मिशन राबविण्याची गरज भासत नाही.
संपूर्ण देशात स्वच्छतेविषयी जनजागृती केली जाते पण येथील ग्रामपंचायत किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेते मंडळींना विसर पडला आहे. शहरात भाजप कार्यकर्ते जागोजागी स्वच्छ मोहीम राबवित आहेत. परंतु आमगावचे कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात घाणच घाण आहे.

दुर्गंधीमुळे नारायण नगरवासी त्रस्त
धान गिरणी समोर मटन मार्केट व इंडियन बॉयलरचे दुकाने सजली आहेत. येथील दुकानातील कोंबड्यांचे पंख नागरिकांच्या घरात उडून जातात. बकरा, कोंबडी, मासे आदीचे वया जाणारे अवयव येथील कुत्रे नारायण वासीयांच्या घरापर्यंत नेतात आणि येथील दुर्गंधीमुळे नगरवासीयांना श्वास घेणे कठिण होत आहे. या संदर्भात तक्रार ग्रामपंचायतकडे करण्यात आली. त्यानुसार बाजार समितीने दुकानदारांना नोटीस बजावली पण स्थिती जैसे थे आहे.
कृउबासचे गाळे जुगारासाठी
कृषी उत्पन्न बाजार समितीचे गाळे कृषी उपज व्यवसायाकरिता उपलब्ध करण्यात येतात पण येथील नेते मंडळीनी सदर गाळे कृषी व्यतिरिक्त व्यवसायासाठी दिले आहे. बहुतेक गाळ्यामध्ये महाराष्ट्र लॉटरी, अवैध आॅनलाईन जुगाराचे अड्डे चालवित आहेत. यासंबंधी संचालक मंडळानी योग्य कारवाई करावी जेणे करुन युवा शेतकरी वर्ग जुगाराच्या अधिन होवू नये अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

कृउबासच्या परिसरात नेहमी स्वच्छता बाळगली जाते. त्यासाठी स्चछत कामगार नेमले आहेत. बाजार समितीचा परिसर मोठा असल्याने ग्रामपंचायत व जि.प.च्या जागेवर घाण पसरलेली असते. नाली तयार करण्यासाठी ग्रामपंचायतकडे निवेदन दिले आहे. मटन मार्केट मधील विक्रेत्यांना कोंबडी किंवा बकरे कापण्यासाठी मज्जाव केल्याचे नोटीस बजावण्यात आले आहे.
- चव्हाण
सचिव, कृउबास, आमगाव

 

Web Title: Weekly market is full of dirt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.