एकाच डॉक्टरवर तालुक्याचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 10:13 PM2018-11-22T22:13:53+5:302018-11-22T22:14:44+5:30

गरीब आदिवासी व दुर्गम भागाने व्याप्त असलेल्या सालेकसा तालुक्यात आरोग्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शासन एकीकडे ग्रामीण भागात आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन देत आहे.

The weight of the taluka of the same doctor | एकाच डॉक्टरवर तालुक्याचा भार

एकाच डॉक्टरवर तालुक्याचा भार

Next
ठळक मुद्देआरोग्य विभागाचे दुर्लक्ष : ग्रामीण रुग्णालय ठरतेय शोभेची वास्तू

विजय मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : गरीब आदिवासी व दुर्गम भागाने व्याप्त असलेल्या सालेकसा तालुक्यात आरोग्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शासन एकीकडे ग्रामीण भागात आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन देत आहे. मात्र दुसरीकडे या तालुक्यातील नागरिक आरोग्याच्या सोयी सुविधांपासून वंचित आहेत.
येथील ग्रामीण रुग्णालयाचा भार केवळ एका कंत्राटी डॉक्टरवर असल्याने रुग्णांना चौवीस तास आरोग्य सेवा कशी मिळणार यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. सालेकसा येथे ग्रामीण रुग्णालय सुरू होवून २५ वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. मागील २५ वर्षापासून या रुग्णालयात विविध समस्या निर्माण होत आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.
ग्रामीण रुग्णालयात योग्य उपचार मिळत नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयात जावून उपचार घ्यावे लागत असल्याचे चित्र आहे. यामुळे त्याचा आर्थिक भुर्दंड सुध्दा सहन करावा लागत आहे.
तालुक्यातील सर्वसामान्य गरीब,आदिवासी लोकांना मोफत आरोग्य सेवा मिळावी म्हणून ९० च्या दशकात सुरुवातीपासूनच सालेकसा येथे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याची मागणी शासनाकडे रेटून धरली होती. त्याची दखल घेत १९९४ मध्ये येथे ग्रामीण रुग्णालय सुरु करण्यात आले. तत्कालीन आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले.
काही काळ ग्रामीण रुग्णालयात रुग्ण सेवा सुरळीतपणे सुरू होती.
डॉक्टर व कर्मचाऱ्यांची पदे भरली असल्यामुळे रुग्णांंवर वेळेवर उपचार केले जात होते. मात्र मागील काही महिन्यांपासून या ग्रामीण रुग्णालयाकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे हे रुग्णालय केवळ नाममात्र ठरत आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची चारे पद मंजूर आहेत. त्यात एक अधीक्षक, दोन शल्यचिकित्सक व एक स्त्रीरोग तज्ज्ञांचा समावेश आहे.
डॉक्टरांची चार पदे मंजूर असली तरी आजवर येथे केवळ दोनच डॉक्टर कार्यरत असल्याची माहिती आहे. मागील दोन वर्षापासून अधीक्षक डॉक्टर म्हणून डॉ. पी. एस. रामटेके कार्यरत आहे.
तर चार महिन्यांपूर्वी डॉ.अभिषेक चांद रुजू झाल्याने रुग्णसेवा सुरळीत झाली होती. डॉ. रामटेके हे त्यांच्या मुलाची प्रकृती गंभीर असल्याने दीर्घ रजेवर गेले आहेत. त्यामुळे सध्या रुग्णालयाचा भार डॉ. चंद यांच्यावर आहे.
मात्र आरोग्य विभागाने अद्यापही रुग्णालयात पर्यायी डॉक्टराची नियुक्ती केली नाही.

दररोज दीडशे रुग्णांची तपासणी
ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथे २४/७ सेवा अर्थात सातही दिवस २४ तास औषधोपचार मिळणे आवश्यक आहे. परंतु केवळ एकच डॉक्टर असल्याने त्यांच्यावर बाह्यरुग्ण तपासणी विभागात दररोज दीडशे रुग्णांची तपासणी करण्याचा भार आणि रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांकडे लक्ष द्यावे लागत आहे. यामुळे त्यांची चांगलीच अडचण होत आहे.

Web Title: The weight of the taluka of the same doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.