वनविभागातर्फे वृक्षदिंडीचे स्वागत
By admin | Published: June 26, 2017 12:24 AM2017-06-26T00:24:14+5:302017-06-26T00:24:14+5:30
ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशन नागपूरच्यावतीने विधान परिषदेचे आ. अनिल सोले यांच्या नेतृत्वाखाली
४ कोटी वृक्ष लागवड : अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ७३ हजार वृक्ष लागवड
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशन नागपूरच्यावतीने विधान परिषदेचे आ. अनिल सोले यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या जनजागरण वृक्षदिंडीचे स्वागत अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले.
१ ते ७ जुलै या कालावधीत ४ कोटी वृक्षारोपण करण्याची मोहीम राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे. वृक्षारोपण अभियानाच्या संकल्प पूर्तीसाठी नागपूर येथील ग्रीन अर्थ आॅर्गनाईझेसनतर्फे आ. अनिल सोले यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांमध्ये वृक्ष प्रेमासाठी, जनजागरण करण्याच्या हेतूने वृक्षदिंडी काढण्यात आली आहे. अर्जुनी-मोरगाव वनपरिक्षेत्रामध्ये वृक्षदिंडीचे आगमन होताच वनपरिक्षेत्राधिकारी छत्रपाल रहांगडाले यांनी स्वागत केले.
यावेळी मार्गदर्शन करताना आ. अनिल सोले म्हणाले, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष संवर्धन करणे काळाची गरज आहे. जंगलाचे प्रमाण वाढावे, नागरिकांनी वृक्ष लागवडीसाठी पुढे यावे, ग्रामस्थांमध्ये वृक्षाबद्दल आकर्षण वाढावे, त्यांच्यामध्ये जाणीव जागृती व्हावी यासाठी गावागावात आकर्षित असे वृक्षरथ वृक्षदिंडीच्या माध्यमातून भ्रमण केले जात आहे. मागील काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आहे. यावर आळा घालण्यासाठी राज्य शासन विविध उपाययोजना राबवित आहे. मानवी जीवनाला निसर्गाच्या सहवासातून इंधन, पाणी, शुद्ध हवामान, रोजगार निर्मिती मोफत मिळते. परंतु आपण त्याची परतफेड करू शकत नाही. वाढता प्रदुषणावर आळा सविण्यासाठी प्रत्येकानी एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
७३ हजार वृक्ष लागवड
अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाच्या वतीने ७३ हजार ८८४ वृक्ष लागवड केली जाणार असल्याचे वनपरिक्षेत्राधिकारी छत्रपाल रहांगडाले यांनी सांगितले. वृक्ष लागवड ही एक लोकचळवळ व्हावी यादृष्टीने ग्रामस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. बुटाई भाग १ मध्ये ११ हजार ११०, बुटाई भाग २ मध्ये २५ हजार, झरपडा १६ हजार ६६५, बोदरा २ हजार २२२, मालकनपूर १८ हजार ८८७ असे ७३ हजार ८८४ वृक्ष लागवड केली जाणार आहेत. यात विविध प्रजातींचा समावेश करणार आहे. वृक्षदिंडी आगमनाप्रसंगी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.