बुद्धांच्या मार्गावर चालूनच विश्व आणि मानवजातीचे कल्याण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:22 AM2021-05-28T04:22:12+5:302021-05-28T04:22:12+5:30
गोंदिया : बुद्ध आणि त्याचा धम्म जगाला तारक आहे. धार्मिक कर्मकांड, अंधश्रद्धेच्या पलीकडे वैज्ञानिक दृष्टिकोन राखून बुद्धांनी प्रज्ञा, शील ...
गोंदिया : बुद्ध आणि त्याचा धम्म जगाला तारक आहे. धार्मिक कर्मकांड, अंधश्रद्धेच्या पलीकडे वैज्ञानिक दृष्टिकोन राखून बुद्धांनी प्रज्ञा, शील करुणा, मैत्री, अष्टांगिक मार्ग, दहा पारमिता दिलेल्या आहेत. या मार्गावर चालून विश्व आणि समस्त मानवजातीचे कल्याण होऊ शकते. अनुयायी उपासकांनी बुद्धांचे विचार खऱ्या अर्थाने आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणले पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या कर्मकांडात न अडकता वेळेचे महत्त्व जाणून पैशांची उधळपट्टी न करता भावी पिढीकरिता शैक्षणिक संस्थान आणि प्रशिक्षण केंद्र निर्माण करावे, असे मार्गदर्शन पर प्रतिपादन भदंत डॉ. चंद्रकित्ती ( मेरठ) यांनी केले.
बुद्ध पौर्णिमानिमित्त आयोजित ‘धम्म देसना’ धम्म संदेश ऑनलाइन वेबिनारमध्ये ते बोलत होते. तथागत गौतम बुद्धांचे मानवतावादी विचार आणि त्यांचा धम्म विश्व उद्धारक आहे. बुद्धांचे मानवतावादी विचार संदेश सर्व समाजातील जनमाणसात पोहोचले पाहिजे. जेणेकरून त्यांनी त्याचे अनुसरण केले पाहिजे व आचरणात आणले पाहिजे. या उद्देशाने बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून २० ते २६ मेपर्यंत संविधान मैत्री संघ, समता सैनिक दल, महिला सशक्तीकरण संघ व सर्वसमाज विचार महोत्सव समिती यांच्या संयुक्तवतीने विविध ऑनलाइन बौद्धिक व जागृती कार्यक्रम उपासक-उपसिका-विद्यार्थी सर्व सामान्यांसाठी आयोजित करण्यात आले आहे.
ऑनलाइन जागृती सप्ताह कार्यक्रम ‘बुद्ध आले दारी’ अंतर्गत धम्म देसना व्यतिरिक्त वृक्षारोपण, बुद्ध वंदन-अभिवादन, बौद्ध बनो-बौद्ध दिखो, प्रश्नमंजूषा, चित्रकला, क्राफ्ट प्रदर्शनी, बौद्ध दर्शन, बुद्ध के मानवतावादी विचार, बौद्ध काव्य रचना-गीत प्रस्तुती याप्रकारे अन्य बौद्धिक प्रतियोगिता कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या स्पर्धेचे निकाल शुक्रवारी (दि.२८) घोषित करण्यात येणार आहेत. या उपक्रमात जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून अनुयायी शामील झाले होते.