उचल केलेल्या रकमेची सिंचन विहीर ‘बेपत्ता’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 12:58 AM2018-06-07T00:58:52+5:302018-06-07T00:58:52+5:30
तिरोडा तालुक्याच्या ग्रामपंचायत काचेवानी अंतर्गत २०१०-११ मध्ये एमआरईजीएस अंतर्गत मंजूर ११ सिंचन विहिरींपैकी एक सिंचन विहीर तयारच करण्यात आली नाही. मात्र त्या विहिर बांधकामाचे पैसे काढून हडपण्यात आल्याचा प्रकार उघडीकीस आला आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर आता नरेगा गोंदियाचे बीडीओ यांनी चौकशी सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
काचेवानी : तिरोडा तालुक्याच्या ग्रामपंचायत काचेवानी अंतर्गत २०१०-११ मध्ये एमआरईजीएस अंतर्गत मंजूर ११ सिंचन विहिरींपैकी एक सिंचन विहीर तयारच करण्यात आली नाही. मात्र त्या विहिर बांधकामाचे पैसे काढून हडपण्यात आल्याचा प्रकार उघडीकीस आला आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर आता नरेगा गोंदियाचे बीडीओ यांनी चौकशी सुरू केली आहे.
काचेवानी येथील शेतकऱ्यांसाठी २०१०-११ मध्ये ११ विहिरी बांधकामासाठी प्रत्येकी एक लाख ९० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्या. यापैकी १० विहिरींचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. पण लिंबाजी बाबू रहांगडाले यांच्या शेतातील विहिरीचे भूमिपूजन झाले नाही. सामानही आणले नाही व बांधकामही झाले नाही. सिंचन विहिरींच्या कामाकरिता अकुशल व कुशल असा दोन प्रकारचा निधी ग्रामपंचायतला पाठविण्यात आला होता. ग्रामपंचायत कुशल कामाकरिता साहित्य बोलाविल्यानंतर धनादेश किंवा नगदी पैसे दिले जात होते. काही विहिरी २०१० ते २०१२ पर्यंत पूर्ण दाखविण्यात आल्या. अधिक विहिरींचे काम जानेवारी ते एप्रिलमध्ये सुरू करण्यात आले होते.
लिंबाजी रहांगडाले यांच्या शेतात विहीर तयारच करण्यात आली नाही. मात्र विहिरीच्या साहित्याकरिता आलेले ५० हजार रूपये तत्कालीन सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांनी हडपल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. उल्लेखनिय म्हणजे लिंबाजी यांच्या शेतातील विहिरीचे बांधकाम सुरू होण्याची तारिख ३ सप्टेंबर २०११ दाखविण्यात आली. त्यानुसार त्यांना ५० हजार रूपये दिल्याचे ग्रामपंचायतने दाखविले आहे. मात्र विहिरीचे बांधकाम सप्टेंबर महिन्यात सुरू करता येत नाही. कारण कालावधीत थोड्या फार प्रमाणात पाऊस असतो. काही ठिकाणी रोवण्या सुरू असतात व काही रोवण्या संपलेल्या असतात. त्यामुळे ग्रामपंचायतने सप्टेंबर २०११ रोजी काम सुरू दाखविल्याने संपूर्ण रकमेचा अपहार तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. लिंबाजी रहांगडाले यांच्या शेतात (गट क्रमांक १८२) मंजूर झालेल्या सिंचन विहिरीचा कार्यारंभ झालाच नाही. खोटी माहिती पुरवून विहिरीच्या साहित्याकरिता देण्यात आलेली ५० हजार रुपयांची अग्रीम रक्कम ग्रामपंचायतने हडपली आहे. याची तक्रार वर्तमान सरपंच मंडारी यांनी केली आहे. नरेगा जि.प.चे बीडीओ सतिश लिल्हारे यांनी काचेवानी येथे येवून चौकशी केली. शेतात जावून पाहणी केली असता शेतात त्यांच्या भावाची विहीर आहे, पण रहांगडाले यांच्या शेतात विहीर आढळली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दुसऱ्याची विहीर दाखविली
तपासणीसाठी गोंदिया जि.प.चे बीडीओ सतिश लिल्हारे, तिरोड्याचे सहायक कार्यक्रम अधिकारी एल.डी. चौधरी व सोबत कनिष्ठ अधिकारी तुरकर व बावणकर आले. दरम्यान त्यांना बेनिराम रहांगडाले यांच्या शेतातील विहीर दाखविण्यात आली, लिंबाजी रहांगडाले यांचे शेत दाखविण्यात आले नसल्याची विश्वसनीय माहिती आहे.
पूर्णत्वाचे खोटे प्रमाणपत्र
लिंबाजी रहांगडाले यांच्या शेतात सिंचन विहिरीचे काम सुरूच झालेच नाही. मात्र सन २०१५-१६ मध्ये पूर्णत्वाचे खोटे प्रमाणपत्र प्रशासनाला देण्यात आले. अनुक्रमांक (१८३३००२०२६/डब्ल्यूसी/ए/एसएसईटी१२१३/४१२४०१) नुसार प्रमाणपत्र देण्यात आले. त्यातून सदर विहिरीचे बांधकाम दाखविण्यात आले. यात कामाचे नाव सिंचन विहीर, स्थळ-लिंबाजी रहांगडाले, कार्यान्विय यंत्रणा-ग्रामपंचायत काचेवानी, प्रशासकीय मंजुरी २८ डिसेंबर २०११, तांत्रिक मान्यता ३५ दिनांक ३ नोव्हेंबर २०११ व काम सुरू झाल्याचा दिनांक ३ सप्टेंबर २०११ सांगितले असून खर्च मंजुरी १७ हजार ५२० व साहित्य रूपये ५० हजार असे एकूण ६७ हजार ५२० रूपये खर्च दाखविण्यात आला आहे. पूर्णत्वाच्या प्रमाणपत्रावर तत्कालीन ग्रामसेवक प्र.ह.वासनिक यांची स्वाक्षरी आहे.
अपहार करण्याऱ्यांची सत्ता
काचेवानी ग्रामपंचायतमध्ये चार लाख ७० हजार रूपयांच्या अपहार प्रकरणात समाविष्ट असणारे तत्कालीन सरपंच तथा वर्तमान उपसरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांच्याच कारकिर्दीतील हे प्रकरण आहे. त्यामुळे या प्रकरणात ते अडकण्याची दाट शक्यता आहे. चौकशीत पुन्हा काही प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता आहे.
‘तक्रारीनुसार चौकशी करण्यात येत आहे. तलाठी व ग्रामपंचायत रेकार्ड मागविण्यात आला आहे. चौकशीअंती सत्य समोर येईल.’
-सतिश लिल्हारे,
नरेगा बीडीओ, जि.प. गोंदिया.
‘मी रोजगार सेवक होतो. या सिंचन विहिरीचे बांधकाम झालेच नाही. कोणतेही साहित्य पडले नव्हते. विहिरीचे काम सप्टेंबर महिन्यात सुरू होत नाही.’
-पप्पू सय्यद,
तत्कालीन रोजगार सेवक, काचेवानी.