बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय? शासन विचारात; विद्यार्थी संभ्रमात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:33 AM2021-05-25T04:33:18+5:302021-05-25T04:33:18+5:30
गोंदिया : कोरोनाच्या संसर्गामुळे बारावीची परीक्षा दोन वेळा पुढे ढकलण्यात आली. आताही कोरोना संकट कायमच आहे. त्यामुळे बारावीची परीक्षा ...
गोंदिया : कोरोनाच्या संसर्गामुळे बारावीची परीक्षा दोन वेळा पुढे ढकलण्यात आली. आताही कोरोना संकट कायमच आहे. त्यामुळे बारावीची परीक्षा होणार की नाही याबाबत विद्यार्थी संभ्रमात आहेत. परीक्षेवर काय पर्याय होऊ शकतो याची चाचपणी शिक्षण विभाग व शासन करीत आहे. काहीही करा; पण एकदाचा निर्णय घ्यावा, असा सूर विद्यार्थ्यांतून उमटत आहे.
बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातीलर टर्निंग पाॅइंट असतो. मात्र यावर्षी कोरोनाचे संकट आल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रथम ऑनलाइन अभ्यासक्रम करावा लागला. त्यानंतर काही दिवसांनी काॅलेज सुरू झाले. मात्र नियमित वर्ग भरलेच नसल्याने अनेकांच्या डोक्यावरून अभ्यासक्रम गेला. त्यातच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची स्थिती बिकट आहे. अनेकांकडे स्मार्ट फोन नव्हते तर काहींच्या गावामध्ये नेटवर्क समस्या कायमचीच होती. त्यामुळे काय करावे, हा संभ्रम विद्यार्थ्यांना कायम होता. त्यातच परीक्षेची तारीख जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासात गती घेतली. मात्र दोन वेळा परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा उत्साह गेला. आता तर अनेकांना काय शिकलो हेसुद्धा आठवत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे सामाईक परीक्षेचा पर्याय शासनाने निवडावा, अशी काहींची मागणी आहे. मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना पास करता येते का यावर शिक्षणतज्ज्ञांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत.
................
जिल्ह्यातील बारावीचे एकूण विद्यार्थी- २०,८५६
मूले- १०,६२७
मुली- १०,२२९
.................
काय असू शकतो पर्याय
शाळा स्तरावर परीक्षेचे आयोजन करण्यास हरकत नाही. एका वर्गात जास्तीत जास्त बारा ते १५ विद्यार्थी बसायला हवेेत. परीक्षेपूर्वी शाळा निर्जंतुक करावी, शिक्षकांना फेसशिल्ड, हॅण्डग्लोज व लसीकरण अनिवार्य असावे. शक्यतो विद्यार्थ्यांचेही लसीकरण करावे व सर्वांना सर्जिकल मास्क पुरवावे. आजारी विद्यार्थ्यांबाबत शासनाने योग्य धोरण ठरवावे. बारावीनंतरचे प्रवेश आणि इतर सर्व प्रक्रियांसाठी परीक्षा घेणे गरजेचे आहे.
- मिलिंद रंगारी, शिक्षणतज्ज्ञ
........................
मागील वर्षापासून कोरोनाच्या संसर्गामुळे बारावीची परीक्षा लांबली आहे. यासंदर्भात आता शासनस्तरावर विचारविर्मश केला जात आहे. कोरोनाकाळात परीक्षा घेण्यापेक्षा दहावी, अकरावी आणि बारावीच्या प्रात्याक्षिकांतून विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनानुसार गुणानुसार पुढच्या वर्गासाठी गुणदान करावे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.
- सुशील पाऊलझगडे, शिक्षणतज्ज्ञ
...................................................
मागील वर्षभरापासून कोरोनामुळे ग्रामीण भागात तर परिस्थिती वेगळी आहे. कोरोनामुळे शाळा, काॅलेज भरले नाही. त्यामुळे अभ्यासक्रम व्यवस्थित झाला नाही. आता सर्वच विद्यार्थी अभ्यासक्रमही विसरले आहेत. त्यामुळे परीक्षा न घेता सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करावे. म्हणजे, कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही.
- विनायक गायधने, शिक्षणतज्ज्ञ
.....................................................
विद्यार्थी संभ्रमात
यावर्षी ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण केला. कोरोना संकटामुळे काॅलेज पाहिजे त्या प्रमाणात झाले नाही. दिवाळीनंतर परीक्षेची चांगली तयारी केली. मात्र पुन्हा कोरोना संकटामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. आता जून महिना येत असतानाही परीक्षा झाल्या नाही. आम्हाला शिक्षण विभागाने संभ्रमात ठेवू नये.
- राकेश नेवारे, विद्यार्थी
...................................
कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा बंद होत्या तरीही शिक्षकांनी भरपूर मेहनत घेत ऑनलाइनच्या माध्यमातून अभ्यासक्रम पूर्ण केला. परीक्षेची तारीखही निश्चित झाली होती. कोरोनामुळे परीक्षा झाली नाही. दोन वेळा तारीख पुढे ढकलली. त्यामुळे अभ्यास करणे कंटाळवाणे झाले आहे.
- अक्षय काकडे, विद्यार्थी
............................................
कोरोनामुळे आमचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. शिक्षण विभागाने सीईटी तसेच सामाईक परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करावे. त्यानुसार पुढील वर्गातील प्रवेश घेताना अडचण जाणार नाही. मात्र याबाबत निर्णय त्वरित घ्यावा. यामुळे विद्यार्थ्यांची अडचण दूर होईल.
- नंदिता पाऊलझगडे, विद्यार्थिनी.