काय सांगता...२३ कि.मी.च्या रस्त्यावर तब्बल १४६३ खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:32 AM2021-08-22T04:32:01+5:302021-08-22T04:32:01+5:30
रिॲलिटी चेक नरेश रहिले गोंदिया : कोरोनाच्या नावावर पैसे नसल्याचा कांगावा करून विकास कामांना खिळ घालण्याचा प्रकार होत असल्याचे ...
रिॲलिटी चेक
नरेश रहिले
गोंदिया : कोरोनाच्या नावावर पैसे नसल्याचा कांगावा करून विकास कामांना खिळ घालण्याचा प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. दररोज हजारो लोकांची वर्दळ असलेल्या गोंदिया- आमगाव मार्गावरील केवळ २३ कि.मी.च्या अंतरात तब्बल १४६३ खड्डे पडले आहेत. हे खड्डे मृत्यूला आमंत्रण देत आहेत. एक खड्डा वाचविण्याच्या नादात वाहन दुसऱ्या खड्ड्यात जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र ह्या खड्ड्याच्या दुरुस्तीसाठी पाऊल उचलत नाही. या रस्त्यावर बसलेला यमराज कधी कुणाचा बळी घेईल हे सांगता येत नाही.
गोंदिया ते आमगाव हे अंतर २५ कि.मी.चे आहे. परंतु आमगावपासून किंडगीपार नाल्यापर्यंत दोन कि.मी.चा सिमेंटचा पक्का रस्ता तयार आहे. परंतु किंडगीपार नाल्यापासून किंडगीपार रेल्वे चौकी या अर्धा कि.मी.च्या रस्त्यात तब्बल १५० खड्डे आहेत. या खड्ड्यांमुळे अनेकांना प्राणास मुकावे लागले. किडंगीपारच्या डोयेवाडाजवळ असलेल्या खड्ड्यात अनेक व्यापाऱ्यांचा व तरुणांचा खड्ड्यामुळे अपघात होऊन मृत्यू झाला. किंडगीपारच्या चौकीपासून ठाणापर्यंतचा रस्ता थोडा बरा आहे. परंतु ठाणापासून तर दहेगाव या दोन कि.मी.चा रस्ता खड्ड्यातच आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. अदासी येथील सावरकारटोलीपासून अदासीपर्यंत जागोजागी खड्डे असल्याने या खड्ड्यांनी लोकांची बळी घेतला आहे. रात्रीच्यावेळी अंधारामुळे हे खड्डे दिसत नाहीत परिणामी खड्ड्यात पडून वाहन चालक जखमी झाले आहेत. स्वत: पडल्याने ते तक्रार करायला पुढे येत नाहीत. अदसी ते खमारीपर्यंतचा रस्ता थोडा बरा आहे. परंतु खमारीच्या पुढे असलेल्या भरतटोली परिसरातील रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. गोंदियाच्या फुलचूर येथील रस्त्यावर मोठे खड्डे असून या रस्त्यावरून वाहन चालविताना वाहनाचे संतुलन बिघडले. या रस्त्यावरून स्वत: जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुकाअ व जिल्ह्यातील सर्वच मोठे व लहान अधिकारी ये-जा करतात. तरीही त्यांचे या रस्त्याकडे लक्ष नसेल असे वाटते. रस्त्याची हालत खस्ता झाली असून या रस्त्याची डागडुजी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पुढे येत नाही.
....................
किती बळी घेणार
गोंदिया ते आमगावच्या किडंगीपार या २३ कि.मी.च्या अंतरात १४६३ खड्डे आहेत. लोकमत प्रतिनिधीने स्वत: या रस्त्यावरील खड्डे मोजून हा प्रकार पुढे आणला. उदासीन असलेल्या प्रशासनाने जागे व्हा हा नागरिकांचा सूर त्यांच्या कानापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला. या रस्त्यावरील खड्ड्यांनी अनेकांचा जीव घेतला. हा रस्ता आणखी किती बळी घेणार असा सवाल नागरिक करीत आहेत.