काय सांगता! दीड वर्षात तीन गावात कोरोनाचा शिरकावच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:20 AM2021-06-19T04:20:26+5:302021-06-19T04:20:26+5:30

गोंदिया : मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाने सर्वत्र कहर केला. अशात गोंदिया जिल्ह्यात २७ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला ...

What do you say! In a year and a half, there is no corona in three villages | काय सांगता! दीड वर्षात तीन गावात कोरोनाचा शिरकावच नाही

काय सांगता! दीड वर्षात तीन गावात कोरोनाचा शिरकावच नाही

Next

गोंदिया : मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाने सर्वत्र कहर केला. अशात गोंदिया जिल्ह्यात २७ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर जवळपास जिल्हा कोरोनामुक्त होता. मे महिन्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आणि रुग्ण संख्येचा आलेख मागील दीड वर्षात तब्बल ४१ हजार रुग्ण संख्येवर पोहचला. कोरोनाचा सर्वत्र प्रादुर्भाव वाढ असताना जिल्ह्यातील तीन गावांनी अद्यापही कोरोनाचा शिरकाव होऊ दिला नसून कोरोनाला वेशीवरच रोखले आहे.

जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील कुलपा, आमगाव तालुक्यातील करंजी आणि गोरेगाव तालुक्यातील सटवा या तीन गावांनी अद्यापही कोरोनाला आपल्या गावात प्रवेश करू दिला नसून दीड वर्षात या गावात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळलेला नाही. आरोग्य, महसूल आणि जिल्हा परिषद या तिन्ही विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब पुढे आली आहे. राज्य शासनाने अलीकडेच आतापर्यंत एकही कोरोना बाधित रुग्ण न आढळलेल्या गावाला कोरोनामुक्त गाव योजनेंतर्गंत पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. याच अनुषंगाने जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषदेला आपल्या जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावांची माहिती मागविण्यात आली होती. याच अनुषंगाने सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आणि आशा सेविकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावांची माहिती संकलित करण्यात आली. ज्या गावात आतापर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही, एक ते दोन रुग्ण आढळलेले गाव, गावातल्या गावातच उपचार करून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आणि गावांची नावे आदीची माहिती गोळा करण्यात आली. यात जिल्ह्यातील कुलपा, करंजी, सटवा या तीन गावांमध्ये मागील दीड वर्षांपासून अद्यापही एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे ही तिन्ही गावे आता कोरोनामुक्त गाव स्पर्धेत आहे. या गावांच्या प्राप्त झालेल्या माहितीची पुन्हा चाचपणी केली जाणार असल्याचे जि.प.च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

....................

त्या गावांमध्ये एक ते दोनच रुग्णांची नोंद

जिल्ह्यातील २१ गावांमध्ये मागील दीड वर्षांत केवळ एक दोनच कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. या रुग्णांनी गावातल्या गावात औषधोपचार घेऊन कोरोनावर मात केल्याची बाब पुढे आली आहे. एक ते दोनच रुग्ण आढळलेल्या गावांची सुध्दा माहिती संकलित करण्याचे काम सध्या सुरू आहे.

.............

कोरोनाला वेशीवरच रोखल

मागील दीड वर्षात कोरोनाचा प्रादुर्भाव न झालेल्या कुलपा, करंजी, सटवा या तीन गावांनी कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन केले. गावबंदी, कोरोना संसर्गाच्या काळात बाहेरील व्यक्तीला गावात प्रवेशबंदी, मास्क, सॅनिटायझरचा वापर,गावात जंतूनाशक फवारणी, ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे दिसताच त्वरित चाचणी करून औषधोपचार, गावकऱ्यांमध्ये आरोग्य विभाग व ग्रामपंचायतच्या माध्यामातून जनजागृती केली.

............

गावकऱ्यांची सतर्कता आली कामी

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असताना आणि आपल्या आजूबाजूच्या गावांमध्ये सुध्दा रुग्ण संख्येत वाढ होत असताना आपल्या गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी गावकऱ्यांनी सजग राहून काळजी घेतली. त्यामुळेसुध्दा कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यश आले.

Web Title: What do you say! In a year and a half, there is no corona in three villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.