बंधाऱ्यामुळे नेमके सिंचन कुणाचे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 12:13 AM2018-04-08T00:13:19+5:302018-04-08T00:13:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे डांर्गोलीजवळ वैनंगगा नदीच्या पात्रालगत उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. डांगोर्ली येथील गावकऱ्यांनी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी यंदा फेब्रुवारी महिन्यात वैनगंगा नदीच्या पात्रात सिमेंटच्या चुंगड्यामध्ये रेती भरुन बंधारा तयार केला. हा बंधारा तयार केल्यानंतर दुसरा बंधारा तयार करण्याची गरज नव्हती. मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने बंधारा तयार २ लाख २५ हजार रुपयांचा विनाकारण खर्च केल्याचे डांर्गोली येथील गावकऱ्यांचे म्हणने आहे.
मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने जिल्ह्यात दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देण्याची वेळ येवू नये, यासाठी डांगोर्ली येथील गावकऱ्यांनी एकत्र येऊन लोकसहभागातून ५ हजार सिमेंटच्या बॅगमध्ये रेती, माती भरुन बंधारा तयार केला.हा मजबूत बंधारा बांधल्यानंतर महिनाभरातच त्या बंधाऱ्याजवळ महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने दुसरा बंधारा बांधला. दुसºया बंधाऱ्याच्या निर्मितीसाठी २ लाख २५ हजार रूपये खर्च झाल्याची कबुलीही मजीप्राच्या अधिकाऱ्यांनी दिली. गावकऱ्यांनी तयार केलेल्या बंधाऱ्यामुळे फायदा झाला असताना मजीप्राला दुसरा बंधारा तयार करण्याची गरज का पडली? असा सवाल गावकऱ्यांकडून उपस्थित केला जाते. या बंधाऱ्याच्या निर्मितीमुळे नेमका लाभ कुणाचा झाला? टंचाईची कुणाची दूर झाली आदी प्रश्न निर्माण झाले आहे. डांगोर्ली येथील अबालवृध्दांनी व नागरिकांनी एकत्र येऊन श्रमदानातून वैनगंगा नदीवर बंधारा बांधला. या बंधाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी अडले. या पाण्यामुळे परिसरातील भूजल पातळीत वाढ झाली. विहिरींच्या पाणी पातळीत सुध्दा समाधानकारक वाढ झाली. हा बंधारा ४० मीटर लांब व २ मीटर खोल आहे. या बंधाऱ्यामुळे बिरसोला संगमपर्यंत पाणी अडले. या बंधाऱ्याची लांबी व रूंदी पाहता नागरिकांना सिमेंटच्या खाली बॅगची गरज भासली. त्यांनी गोंदियातील मोठ्या कंत्राटदाराकडून त्या मागविल्या. गावकऱ्यानी मजीप्राच्या अभियंत्यांना सिमेंट बॅग उपलब्ध करुन देण्याची विनंती केली. मात्र त्यांनी गावकऱ्याना सहकार्य केले नसल्याचा आरोप गावकऱ्यांचा आहे. गोंदियाचे नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी २ हजार सिमेंट बॅग उपलब्ध करून दिल्या. तर उर्वरित सिमेंटच्या खाली बॅग गावकऱ्यांनी इकडून तिकडून गोळा केल्या. त्यानंतर १ फेब्रुवारीला गावकऱ्यांनी श्रमदान करुन बंधारा तयार केला. या बंधाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहते पाणी अडविण्यात आले.
हा बंधारा मजबूत व टिकाऊ तयार झाला असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.तर हा बंधारा योग्य पध्दतीने बांधला नसल्याने बंधाऱ्यातून पाणी लिकेज होत असल्याने दुसरा बंधारा तयार करण्यात आल्याचा दावा मजीप्राकडून केला जात आहे.
बंधाऱ्यात अद्यापही पाणी
ज्यावेळी हा मोठ्या बंधारा तयार करण्यात आला त्यावेळपासून आत्तापर्यंत त्या बंधाऱ्यात पाणी अडले आहे. परंतु मजीप्राने महिनाभरापूर्वीपासून पाणी नसल्याचे सांगून गोंदियाकरांना दिवसातून एकच वेळी पाणी देण्याचा फतवा काढला. दुसरा बंधारा निर्मीतीसाठी पाण्याची टंचाई तर दाखिण्यात आली नाही ना अशी चर्चा शहरात आहे.
गावकऱ्यांनी बांधलेला बंधारा मोठा
डांगोर्ली येथे दरवर्षी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणामार्फत शासकीय निधीतून तयार करण्यात येणाºया बंधाऱ्यापेक्षा पाचपट मोठा बंधारा यंदा लोकसहभागातून नागरिकांनी तयार केला. हा बंधारा मजबूत व पाणी थांबेल असा तयार करण्यात आला. या बंधाऱ्याला जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे व उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांनी भेट देवून पाहणी केली होता. हा बंधारा सुसज्ज व मजबूत असाताना मजीप्राने पुन्हा याच बंधाऱ्याजवळ २ लाख २५ हजार रूपये खर्च करून दुसरा बंधारा का बांधला हा मात्र संशोधनाचा विषय आहे.