गोंदिया जिल्ह्यात विधानसभा रिंगणातील ६४ उमेदवारांचे शिक्षण काय? चंद्रिकापुरेच सर्वाधिक उच्चशिक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 05:01 PM2024-11-16T17:01:28+5:302024-11-16T17:02:37+5:30
उच्चशिक्षितांविरोधात काही अल्पशिक्षितांचा लढा : विधानसभेच्या रिंगणात आजमावित आहेत भाग्य
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राजकारणासाठी शिक्षणाची अट नाही परिणामी अशिक्षितांपासून ते उच्चशिक्षितांपर्यंत कित्येकच पुढारी राजकारणातील उच्च पदावर पोहचले आहेत. मात्र, बदलत्या काळानुसार आता मतदारांनी आपला प्रतिनिधी शिक्षित असावा, अशी आशा आहे. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात तब्बल ६४ उमेदवार उतरले आहेत. यामध्ये उच्चशिक्षितांच्या विरोधात अल्पशिक्षितांचा लढा दिसून येत आहे. मात्र, रशिया रिटर्न डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे हे सर्वाधिक उच्चशिक्षित दिसून येत आहेत.
येत्या २० तारखेला विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम होणार आहे. या लढ्यात जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांत एकूण ६४ उमेदवार दंड थोपटून उतरले आहेत. यामध्ये आजी-माजी आमदार आपले भाग्य आजमावित असतानाच काही नवे चेहरे सुद्धा त्यांना लढा देत आहेत. या उमेदवारांमध्ये काही अल्पशिक्षित असून, काही उच्चशिक्षित आहेत. विशेष काही फक्त दोघांनीच विदेशातून शिक्षण घेतल्याचेही दिसत आहे. असे असतानाच रशिया येथून वैद्यकीय शिक्षण घेऊन आलेले अर्जुनी- मोरगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. सुगत चंद्रिकापुरे मात्र सर्वाधिक उच्च शिक्षित दिसत आहेत.
कला शाखेतील १७ उमेदवार
उमेदवारांनी अभ्यासक्रमानुसार घेतलेल्या शिक्षणाकडे लक्ष दिल्यास यामध्ये कला शाखेतील १७ उमेदवार दिसून येतात. यामध्ये काही पदवीधर, तर काही पदव्युत्तर सुद्धा आहेत. विशेष म्हणजे, १२ पर्यंत शिक्षण घेणाऱ्या उमेद- वारांना सामान्य वर्गात टाकले असता त्यांची संख्या सर्वाधिक २९ दिसून आली.
डॉक्टर व अभियंताही मैदानात
निवडणुकीच्या रणांगणात जेथे ६४ उमेदवार आपले भाग्य आजमावित आहेत. तेथेच डॉक्टर व अभियंताही आपले भाग्य आजमावताना दिसत आहेत. यामध्ये डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांच्या अन्य उमेदवारांचा समावेश असतानाच अभियंता गटात रत्नदीप दहिवले यांच्यासह अन्य काही उमेदवारांचा समावेश आहे.
विषयनिहाय शिक्षण
विज्ञान - ०७
कला - १७
वाणिज्य - ०२
वैद्यकीय - ०२
अभियंता - ०४
समाजकार्य - ०३
सामान्य - २९
उमेदवारांचे शिक्षण
आठवी - ०१
दहावी - ०७
बारावी - १९
पदवी - १८
पदव्युत्तर - १९