खिचडी शिजविणे, मुलांना वाटप करणे ही काय शिक्षकांची कामे झालीत....?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:23 AM2021-07-17T04:23:49+5:302021-07-17T04:23:49+5:30
गोंदिया : विद्यार्थ्यांना घडविण्याच्या कामापेक्षा शिक्षकांवर इतर अशैक्षणिक कामांचाच बोजा टाकला जातो. शेकडो प्रकारची अशैक्षणिक कामे शिक्षकांना करावी लागत ...
गोंदिया : विद्यार्थ्यांना घडविण्याच्या कामापेक्षा शिक्षकांवर इतर अशैक्षणिक कामांचाच बोजा टाकला जातो. शेकडो प्रकारची अशैक्षणिक कामे शिक्षकांना करावी लागत असल्यामुळे शिक्षकांचेही हाल होत आहेत. बीएलओची कामे, यात मतदार नोंदणी, मतदार यादी तयार करणे, यादी अद्ययावत करणे, ऑनलाईन माहिती भरणे, सरलसह यू डायस, शालार्थ, शाळासिद्धी या प्रणालींसाठी माहिती देण्याचे काम, कटकटीचे काम सरलचे आहे. सरल या ऑनलाईन प्रणालीअंतर्गत विद्यार्थी, शिक्षक व शाळेसंबंधी २५० हून अधिक प्रकारची माहिती संगणकावर भरावी लागते. शालेय पोषण आहार, मध्यान्ह भोजनाकरिता सामान जमा करण्यापासून त्याचा हिशेब देण्यापर्यंतची कामे, डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर (डीबीटी) योजनेंतर्गत गणवेश, पाठ्यपुस्तके, अल्पसंख्याक, मागासवर्गीयांकरिता असलेल्या विविध योजना, सवलतींचे पैसे सरकारकडून थेट विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खात्यावर जमा होतात. राष्ट्रीयीकृत बँकेत खाती उघडणे, आधारशी जोडणे, आदिवासी, स्थलांतरित कामगार असलेल्या पालकांना गाठणे, विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढून देणे, गेल्या काही वर्षांत तब्बल ५०० हून अधिक शिक्षकांची विविध प्राधिकरणांवर नियुक्ती करण्यात आली आहे. हे शिक्षक अधिकाऱ्यांच्या हाताखाली अक्षरश: अनेक कामे करतात. या शिक्षकांच्या जागी दुसरे शिक्षक दिले न गेल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. विविध शिष्यवृत्त्या, परीक्षांचे अर्ज भरणे, राज्य व केंद्रीय स्तरावरील विविध शिष्यवृत्त्या, दहावीचे परीक्षा अर्ज ऑनलाईन भरून घेणे, याव्यतिरिक्त शाळेच्या विविध उपक्रमांकरिता खासगी संस्था वा व्यक्तींकडून आर्थिक निधी जमा करणे, विविध जयंती, मोहीम, उपक्रम साजरे करून त्यांची माहिती देणे व कोविड काळात लसीकरण केंद्रावरही शिक्षक काम करीत आहेत. विद्यादानापेक्षा बाबूगिरीची कामे शिक्षकांना करावी लागत आहेत.
........................
शिक्षण सोडून इतर कामांसाठीच प्रत्येक शाळेत एक शिक्षक
१) अशैक्षणिक कामांचा बोजा प्रत्येक शाळेवर असल्याने त्या-त्या शाळेतील शिक्षक अशैक्षणिक कामे एका शिक्षकाकडे सोपवून त्या शिक्षकाचे वर्ग घेण्यासाठी तयारी दर्शवितात.
२) एक शिक्षक नुसत्या अशैक्षणिक कामांसाठी लागत असल्याने त्या कामासाठी शाळेतील सातपैकी एक शिक्षक अशैक्षणिक कामेच करीत असतो. त्या शिक्षकाला अशैक्षणिक कामाशिवाय दुसरे कामच करता येत नाही.
३) मुख्याध्यापकांना सतत खिचडी, गणवेश, बैठका व मागितलेली माहिती पुरवावी लागते. त्यातच त्यांचा वेळ जातो. मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांच्या वर्गावर जाताच येत नाही. एवढी अशैक्षणिक कामे मुख्याध्यापकांनाही असतात.
.............................
एकशिक्षकी शाळेचे बेहाल
ज्या पाड्यावर वर्ग एक ते चार आहेत, त्या शाळेला बहुतांश ठिकाणी एकच शिक्षक असतो. या एकशिक्षकी असलेल्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना विद्यादान करावे, की अशैक्षणिक कामे करावीत, हा प्रश्न त्या एकट्या शिक्षकाला पडतो. परिणामी रात्रीच्या वेळी त्या शिक्षकाला घरी बसून कामे करावी लागतात. अधिकाऱ्यांच्या बैठकीला जाता येत नाही. बैठकीला गेले तर शाळेला सुटी द्यावी लागते, अशी दुरवस्था एक शिक्षक असलेल्या शाळेची आहे.
................
शिक्षक संघटना काय म्हणतात...
१) शिक्षकांना विद्यादानाचेच काम देण्यात यावे. अशैक्षणिक कामांच्या ओझ्याखाली शिक्षक दबून जात असल्याने विद्यार्थ्यांना पाहिजे तेवढा वेळ देणे शक्य होत नाही. विद्यादानाशिवाय दुसरे काम शिक्षकांना देण्यात येऊ नये.
- प्रकाश ब्राह्मणकर, विभागीय अध्यक्ष, शिक्षक भारती गोंदिया.
२) शिक्षकांवर शालेय पोषण आहाराची कामे सोपविणे अत्यंत चुकीचे आहे. स्वयंपाक करून मुलांना जेऊ घालण्यासाठी शासनाने वेगळी यंत्रणा उभी करावी. शिक्षकांचा दोष नसतानाही शालेय पोषण आहारामुळे शिक्षकांना धारेवर धरले जाते. शिक्षकांकडून अशैक्षणिक कामे काढून घेण्यात यावीत.
- वीरेंद्र कटरे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ
.............................
शिक्षकांची कामे...
- खिचडी शिजवून मुलांना वाटप करणे
- आधारकार्ड तयार करणे
- शाळेची डागडुजी व रंगरंगोटी करणे
- जनगणना, पटनोंदणी, पालक सभा घेणे
- विद्यार्थ्यांचे बॅंक खाते काढून देणे
- शालेय पोषण आहार वाटप करून त्याच्या नोंदी घेणे
- यू डायसवर माहिती भरणे