पत्नीचे मंगळसूत्र विकावे काय?
By admin | Published: January 17, 2015 11:01 PM2015-01-17T23:01:00+5:302015-01-17T23:01:00+5:30
कर वसुली करून आणा तेव्हाच पगार काढला जाणार, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यामुळे मात्र अनुदान असूनही पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांपासून पगार झाले नाहीत.
पालिका कर्मचाऱ्यांचा सवाल : तीन महिन्यांपासून पगार नाही
गोंदिया : कर वसुली करून आणा तेव्हाच पगार काढला जाणार, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यामुळे मात्र अनुदान असूनही पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांपासून पगार झाले नाहीत. यातून फक्त सफाई कर्मचाऱ्यांचे पगार काढण्यात आले आहेत. तर उर्वरीत कर्मचारी आर्थिक विवंचनेत अडकले असून आता पत्नीचे मंगळसूत्र विकावे असा प्रश्न ते विचारत आहेत.
पालिकेला ११ कोटी कर वसुलीचे टार्गेट आहे. कर वसुली विभागाची लापरवाही म्हणा की अख्या नगर पालिका प्रसाशनाची लेटलतीफी मात्र कर वसुलीचे डोंगर वाढतच चालले आहे. कर वसुलीच्या या प्रकरणात खुद्द जिल्हाधिकाऱ्यांना मधात पडावे लागले होते व त्यांनी कर वसुली विभागातील कर्मचाऱ्यांशी बोलणी केली होती. झाले ते झाले मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी पालिकेतील कर्मचाऱ्यांचे आॅक्टोबर महिन्यापासूनचे पगार अडवून ठेवले आहेत. आता साडे तीन महिने होत असून कर्मचाऱ्यांना पगार मिळाले नसल्याने ते आर्थिक अडचणीत अडकले आहेत.
पालिकेत एकूण ४०० स्थायी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील २७३ सफाई कर्मचारी असून त्यांचे दोन महिन्यांचे पगार काढण्यात आले आहेत. तर १२७ कर्मचारी पगारापासून वंचीत आहेत. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांकडून कर वसुली करा तेव्हाच पगार काढले जातील असे कळविण्यात आल्याची माहिती आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या फतव्यामुळे मात्र कर्मचाऱ्यांत नाराजी व रोषपूर्ण वातावरण दिसून येत आहे. अशा या परिस्थितीत आता पत्नीचे मंगळसूत्र विकावे असा प्रश्न कर्मचारी करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)