दोन वर्षात काय नवीन मिळाले जिल्ह्याला?

By admin | Published: June 7, 2016 07:40 AM2016-06-07T07:40:08+5:302016-06-07T07:40:08+5:30

केंद्रातील भाजप सरकारने दोन वर्षे पूर्ण केली. या दोन वर्षात समाजातील कोणता वर्ग खूष झाला? शेतकरी, मजूर,

What was new in the two years in the district? | दोन वर्षात काय नवीन मिळाले जिल्ह्याला?

दोन वर्षात काय नवीन मिळाले जिल्ह्याला?

Next

प्रफुल्ल पटेल यांचा सवाल : राज्यसभेवर अविरोध निवडीनंतर गोंदियात भव्य सत्कार
गोंदिया : केंद्रातील भाजप सरकारने दोन वर्षे पूर्ण केली. या दोन वर्षात समाजातील कोणता वर्ग खूष झाला? शेतकरी, मजूर, व्यापारी, उद्योजक, नोकरदार कोणता वर्ग सुखी झाला? एवढेच काय या जिल्ह्याला एकही गोष्ट नवीन मिळाली नाही. उलट ज्या गोष्टींना आमच्या कार्यकाळात मंजुरी मिळवून दिली ती कामेही मार्गी लावण्याऐवजी ठप्प पडली आहेत, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेता खा.प्रफुल्ल पटेल यांनी केली.
राज्यसभेवर अविरोध निवडून आल्यानंतर प्रथम आगमनानिमित्त खा.पटेल यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रविवारी सायंकाळी स्थानिक एनएमडी कॉलेजच्या सभागृहात कार्यकर्त्यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी ते मार्गदर्शन करीत होते.
सर्वप्रथम खा.पटेल यांचा गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध संघटनांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. कार्यकर्त्यांनी भलामोठा फुलांचा हार घाल त्यांचे स्वागत केले. जिल्हाभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली होती.
सत्काराला उत्तर देताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, गेल्या दोन वर्षात एकही सकारात्मक कार्य झाले नाही. विधानसभेत धानाच्या पेंड्या जाळून आणि ओबीसींच्या नावे संघटना स्थापन करुन केवळ आपणच शेतकऱ्यांचे आणि ओबीसीचे ठेकेदार आहोत, असा आव आणणारे आता कोणत्या बिळात लपले आहेत, असा प्रश्न खासदार प्रफुल्ल पटेल यांनी उपस्थितांना केला.
वीजेची समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या कायम आहेत. केंद्रातील सरकारने स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. या सरकारला सध्या स्वच्छ भारतीय जनता पक्ष अभियान चालविण्याची गरज असल्याचे खडसे प्रकरणावरुन सिद्ध झाले आहे. चिक्की घोटाळा, दाळ घोटाळा अशी घोटाळ्यांची सुरुवात झाली आहे. पुढेही ही भ्रष्टाचाराची मालिका सुरुच राहणार आहे. आमच्या सरकारवर आरोप करणारेच आता घोटाळ्यात अडकू लागले आहेत, असा आरोप प्रफुल्ल पटेल यांनी केला.
जिल्ह्यात आठ हजार कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन वर्षभरापूर्वी केले, परंतु वर्षभरानंतर आठ कोटी रुपये किमतीच्याही रस्त्याचे काम झाले नाही. पालकमंत्र्यांच्या विधानसभा मतदार संघात या दोन वर्षात एकही उल्लेखनिय काम झाल्याचे त्यांनी सांगावे, असे आवाहनही पटेल यांनी केले. यावेळी मंचावर प्रामुख्याने आ.राजेंद्र जैन, माजी आ.दिलीप बन्सोड, विजय शिवणकर, नरेश माहेश्वरी, विनोद हरिणखेडे, राजलक्ष्मी तुरकर, गंगाधर परशुरामकर, मनोहर चंद्रीकापुरे, देवेंद्रनाथ चौबे, अशोक गुप्ता, महेश जैन, शिव शर्मा, अशोक सहारे, बबलू कटरे, रमेश ताराम, किशोर तरोणे, अविनाश काशीवार, सुरेश हर्षे, डॉ. किशोर पारधी, अंचल गिरी, मोहित गौतम, हरजित जुनेजा उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन नरेश माहेश्वरी व गंगाधर परशुरामकर यांनी तर प्रास्ताविक विनोद हरिणखेडे यांनी केले. यावेळी जिल्हा, शहर, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी, जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा बँक संचालक, नगर पंचायत सदस्य, कृउबास समिती संचालक सोबत जिल्ह्यातील इतर सामाजिक, व्यवसायिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(जिल्हा प्रतिनिधी)

शेतकऱ्यांशी झाला विश्वासघात!
४खा.पटेल म्हणाले, सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत मोदींनी शेतकऱ्यांच्या धानाचे भाव दुप्पट करण्याची घोषणा केली होती. आता केंद्रातील सरकारला दोन वर्षे पूर्ण झालीत. पण दुप्पट भाव करणे तर दूर, हे सरकार धानाला दरवर्षी अवघी ५०-६० रुपये भाववाढ देत आहे. या दराने धानाच्या हमीभावात वाढ झाली तर तीन वर्षानंतर खरेच धानाचे भाव चार हजार रुपये होणार आहेत का? हा शेतकऱ्यांशी केलेला विश्वासघात आहे. ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती हिरावली. ते विद्यार्थी, पालक आज निराश होऊन माझ्याकडे येतात. मात्र शेतकऱ्यांचे आणि ओबीसींचे म्हणवून घेणारे नेते गप्प का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

जनतेच्या समस्यांसाठी रस्त्यावर उतरा
४देशाचे नेते शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुनश्च खासदारकी दिली आहे. नागरिकांच्या समस्या सोडवून गोंदिया व भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवा. गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील येणाऱ्या नगर पालिका निवडणुकीत विजयी होण्यासाठी कामाला लागा. सरकारचा नाकर्तेपणा जनतेसमोर मांडा, त्यांच्या समस्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करा, असे आवाहन यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केले. केवळ सत्काराने मी खूष होणार नाही, तर जनतेला विश्वास देऊन त्यांची कामे करण्यासाठी राष्ट्रवादीची सत्ता आणा, असे ते म्हणाले.

Web Title: What was new in the two years in the district?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.