लेखा विभागाचा कारभार प्रभाऱ्यांवर
By admin | Published: June 16, 2017 01:02 AM2017-06-16T01:02:18+5:302017-06-16T01:02:18+5:30
नगर परिषदेत लेखाधिकारी व लेखापरीक्षक पदावर रूजू झालेले सुधाकर काळे आल्या-आल्या लगेच वैद्यकीय रजेवर गेले आहेत.
लेखाधिकारी मेडिकलवर : लिपीक व रोखपालांकडे प्रभार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नगर परिषदेत लेखाधिकारी व लेखापरीक्षक पदावर रूजू झालेले सुधाकर काळे आल्या-आल्या लगेच वैद्यकीय रजेवर गेले आहेत. परिणामी लेखा विभागाचा कारभार सध्या प्रभारीवर चालत आहे. विभागातील लिपीक व रोखपालांकडे सध्या प्रभार देण्यात आला आहे. त्यामुळे आता साहेब कधी येतील याचा सध्या तरी काहीच नेम दिसून येत नाही.
नगर विकास प्रशासनाने अवघ्या राज्यातच स्थानांतरणाची मोहीम राबवीली. यात गोंदिया नगर परिषदेतील राज्य संवर्गातील कर्मचाऱ्यांचे बाहेर स्थानांतरण करण्यात आले. कर्मचारी गेले तेवढे कर्मचारी नगर परिषदेत रूजू झाले नाहीत. मात्र रूजू झालेले कर्मचारी सुट्या टाकून आता पळ काढू लागले असल्याचे प्रकार नगर परिषदेत दिसून येत आहे. कर्मचाऱ्यांच्या स्थानांतरणाने नगर परिषदेतील महत्वपूर्ण विभाग रिकमे झाले आहेत.
अशातच नगर परिषदेच्या लेखा विभागातील लेखाधिकारी अग्निहोत्री यांचे स्थानांतरण झाले. अगोदरच लेखापरिक्षकांचे पद रिकामे होते. त्यामुळे अग्निहोत्री यांच्या जागेवर आलेले काळे यांना लेखाधिकारी व लेखापरिक्षक अशी नियुक्ती देण्यात आली. माहितीनुसार, २ जून रोजी काळे येथे रूजू झालेत. आता त्यांना नगर परिषदेचे वातावरण भावले नाही का काय झाले, मात्र ७ जून पासून ते वैद्यकीय रजेवर गेल्याची माहीती आहे.
आता साहेबच सुट्टीवर गेले त्यामुळे विभागाचा कारभार विस्कळीत झाला. त्यामुळे रोखपाल दुबे यांच्याकडे सध्या लेखापरिक्षक व लिपीक जयप्रकाश भेंडारकर यांच्या लेखाधिकारी पदाचा प्रभार देण्यात आल्याची माहिती आहे. नगर परिषदेत अगोदरच कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यात या स्थानांतरणाने अधिकच गोंधळ झाला असून पालिकेच्या कारभारावर परिणाम पडत आहे.