वातावरणातील बदलाने गव्हाची वाढ खुंटली
By admin | Published: February 13, 2017 12:20 AM2017-02-13T00:20:27+5:302017-02-13T00:20:27+5:30
वातावरणातील सततच्या बदलामुळे गव्हाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे यंदा गव्हाचे उत्पादन घटणार असल्याचे जानकार शेतकरी बोलत आहेत.
सौंदड : वातावरणातील सततच्या बदलामुळे गव्हाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे यंदा गव्हाचे उत्पादन घटणार असल्याचे जानकार शेतकरी बोलत आहेत.
जिल्ह्यात धानासोबतच आता शेतकरी गव्हाचे पीक घेऊन लागले आहेत. त्यामुळे परिसरातही गव्हाचे पीक घेतले जात आहे. मात्र जिल्ह्यातील सततच्या बदलत्या वातावरणामुळे गव्हाची वाढ खुंटल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात १५ नोव्हेंबर जवळपास पेरणी केलेला गहू आता फेब्रुवारी महिन्यातही पाहिजे तसा वाढलेला नाही. पीक हाती यावे यासाठी शेतकरी वेळोवेळी खत पाणी करीत आहेत.
मात्र बदलत्या वातावरणामुळे गव्हाची वाढ खुंटली असून गहू लांब उंबई टाकू शकत नाही. अशात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा गव्हाचे उत्पादन घटणार असल्याचे जानकार शेतकरी बोलत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. (वार्ताहर)
अवकाळी पावसाची हजेरी
मागील दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यातच शनिवारी (दि.११) सायंकाळी अचानकच अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे पुन्हा थंडी परतून आली असून लोकांना गरम कपडे घालावे लागत आहेत. मध्यंतरी उन्हाळ््याची चाहूल लागली होती व गरम कपड्यांची गरज भासत नव्हती. मात्र आता पाऊस बरसल्याने पुन्हा थंडी वाढली आहे.