बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदोन्नती केव्हा?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 05:04 PM2024-07-02T17:04:04+5:302024-07-02T17:05:00+5:30

२५ वर्षांपासून दुर्गम भागात देत आहेत सेवा: शासन दखल घेईना

When BAMS Medical Officers will be Promoted? | बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदोन्नती केव्हा?

When BAMS Medical Officers will be Promoted?

लोकमत न्यूज नेटवर
केशोरी :
बीएएमएस अर्हताधारक वैद्यकीय अधिकारी गेल्या २५ वर्षांपासून आदिवासीबहुल अतिसंवेदनशील, नक्षलग्रस्त, दुर्गम भागात अत्यंत बिकट परिस्थितीत संपूर्ण आरोग्याची धुरा सांभाळून गट अ दर्जाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सक्षमपणे कार्यभार सांभाळत आहेत. मात्र गट ब संवर्गातील बीएएमएस वैद्यकीय अधिकारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. पण शासनाने अद्यापही त्यांची दखल न घेतल्याने त्यांचा प्रश्न कायम आहे. 


राज्यातील ७२० गट ब संवर्गातील बीएएमएस वैद्यकीय अधिकारी यांच्या पदोन्नतीच्या विषयाला घेऊन विधानसभेत अनेकदा तारांकित प्रश्न व लक्षवेधी सूचना करून याकडे लक्ष वेधण्यात आले. पण याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आहे. कार्यवाही सुरू असल्याची सांगून दिशाभूल केली जात आहे. शासनाच्या कोणत्याही विभागात ठरावीक मुदतीनंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचे नियमोलिखीत आहे. परंतु आरोग्य विभाग गट ब वैद्यकीय अधिकारी यांच्या बाबतीत दुजाभाव करीत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. २५ वर्षांपासून सेवेत असलेल्या गट ब वैद्यकीय अधिकाऱ्यांचा पदोन्नती प्रस्ताव जून २०२३ पासून आरोग्य संचालक कार्यालय मुंबई येथे कार्यवाहीसाठी सादर करण्यात आला आहे. परंतु अजूनही त्या प्रस्तावावर कार्यवाही झाली नाही. 


आदिवासीबहुल अतिसंवेदनशील, डोंगराळ, नक्षलग्रस्त, अति दुर्गम भागात राज्याच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांपर्यंत अविरत आरोग्य सेवा देण्याचे काम वैद्यकीय अधिकारी गट ब करीत आहे. त्यात नियमित सेवा, सर्पदंश, अपघात रुग्ण, आकस्मिक सेवा, प्रसूती सेवा, कुटुंब नियोजन सेवा, गरजेनुसार शवविच्छेदन आदी सेवा सांभाळण्याचे कार्य वैद्यकीय अधिकारी गट ब करीत आहेत. जेव्हा जेव्हा आरोग्य विषयक आपत्कालीन व आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होते तेव्हा गट ब वैद्यकीय अधिकाऱ्यांची शासनाला आठवण येते. तर जेव्हा सेवाविषयक लाभ देण्याची वेळ येते तेव्हा गट ब वैद्यकीय अधिकाऱ्यांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.


पदोन्नतीचा लाभ त्वरित द्या
आजपर्यंत अनेक गट ब वैद्यकीय अधिकारी सेवानिवृत्त झाले. त्यांना अजूनही पदोन्नतीचा लाभ देण्यात आला नाही. त्यामुळे त्यांच्या मनात शासनाप्रति असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. शासनाने हे प्रकरण त्वरित हाताळून सेवा प्रवेश नियम आणि बिंदूना- मावली नुसार गट ब च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ द्यावा अशी मागणी महासंघाचे राज्यध्यक्ष डॉ. अरुण कोळी यांच्या नेतृत्वात गोंदिया शाखेच्यावतीने डॉ. अमर खोब्रागडे, डॉ. प्रेमकुमार बघेले, डॉ. अमित खोडनकर, डॉ. शिवशंकर हरिणखेडे, डॉ. पिकू मंडल, डॉ. कविश्वर किरसान, डॉ. अंबर मडावी, सुरेंद्र खोब्रागडे यांनी केली आहे.

Web Title: When BAMS Medical Officers will be Promoted?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.