जीआर निघाला मात्र बोनस वाटप केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 09:13 PM2018-05-13T21:13:09+5:302018-05-13T21:13:09+5:30
शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल दोनशे रुपये बोनस देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. घोषणेनंतर तब्बल तीन महिन्याने शासनाने त्यासंबंधीचा जीआर काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल दोनशे रुपये बोनस देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. घोषणेनंतर तब्बल तीन महिन्याने शासनाने त्यासंबंधीचा जीआर काढला. मात्र बोनस वाटपाचे आदेश आणि निधी अद्यापही उपलब्ध करुन दिला नाही. त्यामुळे जीआर निघाला मात्र त्याचे वाटप केव्हा करणार असा सवाल जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी करीत आहे.
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी करते. यंदा शासनाने धानाचा हमीभाव अ दर्जाच्या धानाला १५५० रुपये जाहीर केला होता. त्यामुळे जिल्ह्यातील ४० हजारावर शेतकऱ्यांनी शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केली. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने यावर्षी ४ लाख ५० हजार तर आदिवासी विकास महामंडळाने ३ लाख क्विंटल धानाची खरेदी केली. मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. जवळपास ४० टक्के धानाच्या उत्पादनात घट झाल्याने खरेदीत सुध्दा घट झाली. धानाच्या कमी उत्पादनामुळे शेतकऱ्यांना केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन काढता आला नाही. त्यामुळे शासनाने शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल दोनशे रुपये बोनस देण्याची घोषणा केली. यासाठी जिल्ह्यातील ४० हजारावर शेतकरी पात्र ठरले. शासनाने घोषणेनंतर तब्बल तीन महिन्यांनी यासंबंधीचा जीआर काढला. त्यात प्रती शेतकऱ्याला केवळ ५० क्विंटलपर्यंतच बोनस देण्याची मर्यादा लावली. याला सुध्दा आता महिनाभराचा कालावधी पूर्ण होत आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना बोनस वाटप करण्यासंदर्भात कुठलेच आदेश जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला प्राप्त झालेले नाही.
त्यामुळे शेतकरी बोनस आले का म्हणून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयालच्या पायऱ्या झिजवित आहेत. मात्र त्यांना अधिकारी पुन्हा वाट पाहण्याचा सल्ला देत आहे. आधी बोनस देण्याचा आदेश काढण्यासाठी आणि आता बोनस वाटपाचा निधी उपलब्ध करुन देण्यासाठी विलंब केला जात असल्याने शेतकऱ्यांनामध्ये रोष व्याप्त आहे.
यासंदर्भात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी बोनस वाटपासंबंधी अद्याप आदेश प्राप्त झाले नसल्याचे सांगितले.
रब्बीसाठी खरेदी केंद्र केव्हा उघडणार?
जिल्ह्यात रब्बी धानाची बऱ्याच प्रमाणात लागवड केली जाते. सध्या रब्बी धान निघाले असून काही शेतकरी त्या धानाची विक्री सुध्दा करीत आहे. मात्र शासनाने रब्बीतील धान खरेदीसाठी अद्यापही शासकीय धान खरेदी केंद्र सुरु केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करावी लागत असल्याचे चित्र आहे.