फुलचूर, फुलचूरटोला नगरपंचायतीचा दर्जा केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:02 AM2021-09-02T05:02:52+5:302021-09-02T05:02:52+5:30

गोंदिया : शहरालगतच्या फुलचूर आणि फुलचूरटोला या दोन ग्रामपंचायतींचे समायोजन करून नगर पंचायतीचा दर्जा देण्यात यावा. यासंबंधीचा प्रस्ताव २१ ...

When is the status of Fulchur, Fulchurto Nagar Panchayat? | फुलचूर, फुलचूरटोला नगरपंचायतीचा दर्जा केव्हा?

फुलचूर, फुलचूरटोला नगरपंचायतीचा दर्जा केव्हा?

Next

गोंदिया : शहरालगतच्या फुलचूर आणि फुलचूरटोला या दोन ग्रामपंचायतींचे समायोजन करून नगर पंचायतीचा दर्जा देण्यात यावा. यासंबंधीचा प्रस्ताव २१ डिसेंबर २०१९ रोजी दोन्ही ग्रामपंचायतींकडून सादर करून जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला. मात्र, या संदर्भात मार्गदर्शन व सूचनांच्या नावाखाली जिल्हा प्रशासनाकडून नगरपंचायतीचा प्रस्ताव पाठविण्यासाठी सतत टाळाटाळ केली जात आहे. नगर विकास मंत्रालयाने या संदर्भात तसा प्रस्ताव पाठविण्याची सूचनाही जिल्हा प्रशासनाला केल्यानंतरही दोन वर्षांपासून तो प्रस्ताव धूळखात पडला आहे. फुलचूर आणि फुलचूरटोला या दोन्ही गावांतील नागरिकांमध्ये जिल्हा प्रशासनाविरुद्ध रोष निर्माण झाला आहे. प्रस्ताव पाठविण्यात आले नाहीत तर अन्नत्याग सत्याग्रह करण्याचा इशाराही संतप्त नागरिकांकडून देण्यात आला आहे. शहरालगतच्या फुलचूर व फुलचूरटोला या दोन्ही ग्रामपंचायतींची सीमा एकमेकाला लागून आहेत. तसेच जिल्हा मुख्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय ही महत्त्वाची कार्यालये या गाव क्षेत्रात मोडतात. त्या अनुषंगाने संबंधित ग्रामपंचायतींच्यावतीने २०१९ मध्ये प्रस्ताव सादर करण्यात आले. त्या प्रस्तावाची छाननी करून २६ फेब्रुवारी २०२० रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी जनगणना, अकृषक व सर्वेक्षण पूर्ण केले व तो प्रस्ताव शासनाला सादर करणार,अशातच मार्च २०२० पासून कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन करण्यात आले. परिणामी हा प्रस्ताव शासन दरबारी पोहोचू शकला नाही. दरम्यान, शासनाने २६ ऑक्टोबर २०२० रोजी जिल्हा प्रशासनाला प्रस्ताव पाठविल्याबाबत सूचित केले होते. मात्र, त्यानंतरही प्रस्ताव पाठविण्यात आला नाही. याबाबत ग्रामवासीयांनी जिल्हा प्रशासनाची भेट घेऊन १६ जुलै २०२१ रोजी पुन्हा निवेदन सादर केले.

........

यामुळे निर्माण झाली अडचण

नगर परिषदेने जवळील फुलचूर, फुलचूरटोला, मुर्री, पिंडकेपार, कुडवा व कटंगी यांना नगर परिषदेत समाविष्ट करणार असल्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनासमोर सादर केल्याने फुलचूर व फुलचूरटोला या दोन गावांना नगरपंचायत दर्जाचा मार्ग खडतर झाला. त्यातच या दोन्ही ग्रामवासीयांनी नगर परिषदेत जाण्यास नकार दिला असून दोन्ही गावांना एकत्रित करून नगर पंचायतीचा दर्जा देण्यात यावा या भूमिकेवर कायम आहेत.

.............

तर अन्यत्याग आंदोलन करणार

राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर प्रारुप पत्र तयार करण्याला सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने त्वरित फुलचूर व फुलचूरटोलाला नगर पंचायतीचा दर्जा द्यावा, व जिल्हा प्रशासनाने तो अहवाल शासनाला त्वरित पाठवावा, अशी मागणी करण्यात येत आहे, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करणार,असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश चतूर यांनी दिला आहे.

Web Title: When is the status of Fulchur, Fulchurto Nagar Panchayat?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.