कोविशिल्डचा पहिला डोस झाला दुसरा डोस केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:38 AM2021-06-16T04:38:45+5:302021-06-16T04:38:45+5:30
केशोरी : कोरोना प्रतिबंधासाठी पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लसीकरण झाल्यानंतर १८ ते ६० वयोगटातील नागरिकांना ...
केशोरी : कोरोना प्रतिबंधासाठी पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लसीकरण झाल्यानंतर १८ ते ६० वयोगटातील नागरिकांना कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लसींचे डोस देण्याचे नियोजन शासनाने केले आहे. परंतु लसीच्या अनियमित पुरवठ्यामुळे कोविशिल्डचा पहिला डोस होऊन ३ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटूनही दुसरा डोस देण्यात आला नाही. त्यामुळे पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांनी कोविशिल्डचा दुसरा डोस केव्हा असा प्रश्न उपस्थित केला आहे.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ४५ ते ६० वर्ष वयोगटातील नागरिकांसोबतच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लसींच्या लसीकरणाची मोहीम राबविण्यात आली आहे. यात कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा नियमित केला जात असून कोविशिल्ड लसीचा पुरवठा सातत्याने होत नाही. यामुळे कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना ३ महिन्यांचा कालावधी लोटला असून ते दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत आहेत. अनेकदा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन चौकशी करतात. परंतु कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससंबंधी माहिती मिळत नसल्याचे सांगण्यात आले.
कोरोना प्रतिबंधासाठी लस घेणे हे महत्त्वाचे आहे. याची नागरिकांमध्ये जागृती झाली असून लसीकरण सुरू होताच लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसून येत आहे. परंतु शासनाकडून लसीच्या पुरवठ्यामध्ये सातत्य नसल्यामुळे परिसरातील अनेक नागरिक कोविशिल्डच्या दुसऱ्या डोसची वाट बघत आहेत. कोव्हॅक्सिनचे डोस उपलब्ध असून कोविशिल्ड लसीचा पुरवठा अनियिमित होत असल्याने कोविशिल्डचा दुसरा डोस केव्हा मिळणार असा सवाल नागरिकांनी केला आहे.